सत्ताधाऱ्यांना शंभर खून माफ; राम कदम, संभाजी भिडे प्रकरणावर सुप्रिया सुळेंचे टिकास्त्र

सत्ताधाऱ्यांना शंभर खून माफ; राम कदम, संभाजी भिडे प्रकरणावर सुप्रिया सुळेंचे टिकास्त्र

“सरकारविरोधात विरोधी पक्षातील कोणी बोलले तर दबावाचा उपयोग करून त्यांचा आवाज दाबला जातो. मात्र सत्तेत असलेले आमदार मुलींच्या अपहरणाची भाषा करतात, मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाही. दुसऱ्या बाजुला संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातात. याचाच अर्थ तुम्ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला ‘सौ खून माफ’ असे चित्र आज निर्माण झाले आहे”, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी अहमदनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर केली.

“संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यातील आणि देशातील परिस्थिती गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, कुपोषणामुळे मुलांचे मृत्यु होत आहेत, महागाई प्रचंड वाढली आहे, या सगळ्याबाबत लोकांचा संताप अनावर होत आहे. लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही दौरा आखला असून अजितदादा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे काही भागांचा दौरा करणार आहेत. मी काही भागात फिरून सत्य परिस्थिती काय आहे, याचा अभ्यास करणार आहे”, अशी माहिती यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली.

संवाद दौऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होईल? याचे प्रयत्न करु असेही त्यांनी सांगितले. सेल्फी विथ पॉटहोल ही मोहीम आम्ही सुरू केली आहे. लोकांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. आम्ही सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र सरकार लक्ष देत नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री राज्याची धुरा सांभाळतात त्यांनी याकडे जातीने लक्ष घालावे. मुख्यमंत्री विरोधी बाकावर असताना आरोप करायचे सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करायचे आज एवढया शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मग आता कोणावर ३०२ चा गुन्हा दाखल करणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पेट्रोल-डिझेलवरील कर सरकारने कमी केले तर आत्ता २५ रुपयांनी भाव कमी होतील. पण या सरकारला महागाई कमीच करायची नाही. गरीब माणसाचा गळा घोटण्याचे काम या सरकारला करायचे आहे. काल शेतकऱ्यांवर केलेला लाठीचार्ज या सरकारला महागात पडेल असा इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

First Published on: October 3, 2018 8:45 PM
Exit mobile version