कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घ्या, सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी

कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घ्या, सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई : मागणीत लक्षणीय घट झाल्याने काद्यांच्या दरात मोठ्याप्रमाणत घसरण झाली आहे. योग्य भाव मिळत नसल्याने हा कांदा रस्त्यावर विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे. केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घ्या, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.

कृषीमालाच्या आयात-निर्यात धोरणात सातत्य नसल्याचा मोठा फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक झाली. यामुळे बाजारभाव कोसळले असून अक्षरशः कवडीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काहीजणांनी तर कांदा उघड्यावर फेकून दिला आहे. तर दुसरीकडे जगभरात कांदाटंचाई आहे. तेथे मागणी असूनही कांदा निर्यातबंदीमुळे तो जागतिक बाजारपेठेत पाठविता येत नाही. यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी निदर्शनास आणले आहे.

ही परिस्थिती डोळ्यांदेखत सुरू असताना केंद्रीय कृषी आणि वाणिज्य मंत्रालय काय करत आहे? असा सवाल करून सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही मंत्र्यांनी ही स्थिती पाहून तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतु याबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत, ही मोठी खेदाची बाब आहे.

या दोन्ही मंत्रालयांनी या परिस्थितीत एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने आता कांद्याची निर्यातबंदी तातडीने मागे घेऊन देशातील जादा कांदा, जागतिक बाजारपेठेत पाठविल्यास त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळेल. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावे अशी सरकारची इच्छा असेल तर याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक विचार करुन तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे, अशी पुस्तीही खासदार सुप्रिया सुळे यांनी जोडली.

हेही वाचा – यावरून हेच सिद्ध होते…, उद्धव ठाकरे-केजरीवाल भेटीवरून नितेश राणेंची टीका

First Published on: February 25, 2023 12:53 PM
Exit mobile version