सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष?

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष?

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच धक्का बसला. त्यांनी अध्यक्षपद सोडू नये, असा आग्रह पक्षातून होत आहे. मात्र, हे पद सोडण्याच्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या संकेतानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पवार यांची कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवड होण्याची शक्यता आहे.

सहसा त्या कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसत नाहीत, पण काल त्या होत्या. तसेच, त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा सल्ला त्यांनी शरद पवारांना दिला. एकूणच पवार कुटुंबीयांचा शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय झाला असल्याने शरद पवार यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्षपद घरातच राहावे, यानुसार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचीच नावे चर्चेत असून अनेक नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्याच नावाला पसंती दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने दिली. शरद पवार यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला तेव्हा, त्यांच्यासमवेत शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार उपस्थित होत्या.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी, आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे सांगत संघटनेतील बदलाचे संकेत दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपाप्रवेशाबद्दलची चर्चा लक्षात घेता, त्या दृष्टीने बदल केले जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाच्या पुनर्प्रकाशनाच्या निमित्ताने अध्यक्षपदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केले आणि सर्वांनाच धक्का बसला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. त्यावर, दोन-तीन दिवसांत निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवार सकाळपर्यंत पक्षाच्या अध्यक्षपदाचा तीढा सुटलेला असेल असे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

पक्षाचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, जयंत पाटील, अजित पवार, हसन मुश्रीफ, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, राजेश टोपे, फौजिया खान, जयदेव गायकवाड, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे. सध्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार हे स्वत: उपस्थित असून त्यांची अन्य नेत्यांशी चर्चा सुरू आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित नसल्याने शरद पवार यांनी त्यांना फोन करून मुंबईत येण्यास सांगितले. ते संध्याकाळपर्यंत मुंबईत पोहोचणार असून त्यानंतर सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी संध्याकाळी पाच वाजता बैठक होईल, असे सांगण्यात येते.

शरद पवारांकडेच काही काळ सूत्रे राहण्याची शक्यता
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला विरोध करून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे येत्या 10 जूनला हा पक्ष 25व्या पक्षात पदार्पण करणार आहे, तोपर्यंत किंवा राज्यसभा सदस्यत्वाची अद्याप तीन वर्षं बाकी असल्याने, तोपर्यंत अध्यक्षपदाची सूत्रे हाती ठेवावीत, अशी विनंती शरद पवार यांना सर्वच नेत्यांनी केली.

पुढील वर्षी म्हणजेच 2024मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपाविरोधात विरोधकांनी कंबर कसली आहे. अशा वेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससारख्या महत्त्वाच्या पक्षाचे प्रमुखपद न सोडता, भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्व करावे, अशी विनंतीही शरद पवार यांना केली जाऊ शकते. जेणेकरून या पदासाठी सुप्रिया सुळे यांची निवड जरी झाली, तरी शरद पवारांचे मार्गदर्शन त्यांना मिळू शकेल. तूर्तास तरी, अजित पवार यांच्याकडे राज्याची सूत्रे तर, सुप्रिया सुळेंकडे राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी असेल, अशीच चिन्हे दिसत आहेत.

First Published on: May 3, 2023 1:48 PM
Exit mobile version