सरकारे आएंगी, जाएंगी…; सुप्रिया सुळेंकडून वाजपेयींचा तो व्हिडीओ ट्वीट

सरकारे आएंगी, जाएंगी…; सुप्रिया सुळेंकडून वाजपेयींचा तो व्हिडीओ ट्वीट

मुंबई – संजय राऊतांच्या वक्तव्यावरून आज सभागृहात गदारोळ झाल्यानंतर आजचं कामकाज स्थगित करावं लागलं. संजय राऊतांनी विधिमंडळाला चोरमंडळ संबोधल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कसलाही उल्लेख न करता भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं संसदेतील एक छोटंसं भाषण ट्वीट केलं आहे.

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजपाचा विस्तार झाला. त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून भाजपाचे नेते सातत्याने अटल बिहारी वाजपेयींचा दाखला देत असतात. त्याच अटल बिहारी वाजपेयींचा एक व्हिडीओ ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी कोणाचाही कसलाही उल्लेख न करता टोला लगावला आहे. सरकारे येतात, जातात पण देशातील लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, असं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते. तोच व्हिडीओ सुळेंनी ट्वीट केला आहे.

अटल बिहारी वाजपेयी काय म्हणतात?

देशात ध्रुवीकरण होता कामा नये. सांप्रदायिक, धार्मिक आधारावर ध्रुवीकरण होऊ नये. देश संकटांचा सामना करत आहेत. हे संकट आपण निर्माण केलेले नाहीत. जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा संकटाच्या निराकरणासाठी त्यावेळच्या सरकारला आम्ही मदत केली आहे. पाकिस्तानविरोधात भारताची बाजू मांडण्याकरता मला विरोधी पक्षनेता म्हणून पाठवलं होतं. पाकिस्तानी तेव्हा आश्चर्यचकीत झाले होते. ते म्हणाले होती की हे कसे होते. कारण तेथील विरोधी पक्ष नेता राष्ट्रीय कामासाठीही एकत्र येत नाहीत. ते फक्त सरकार कोसळण्यासाठीच प्रयत्न करत असतात. ही परंपरा आणि प्रकृती नाही. पण ही परंपरा जपली आणि टीकली पाहिजे. सरकारे येतात, जातात, पक्ष तयार होतील, फुटतील पण हा देश राहिला पाहिजे. या देशातील लोकशाही अमर राहिली पाहिजे, असं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते.

देशात सध्या राजकीय अराजकता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सातत्याने तणाव निर्माण होतो. त्यातच महाराष्ट्रात सत्तासंघर्ष निर्माण झाला. सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. तर, दुसरीकडे विधिमंडळात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने धडकत आहेत. विरोधकांनी केलेल्या टीकांवर प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. विरोधकांच्या टीकेला सकारात्मक घेऊन सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे. देशातील लोकशाहीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. असा सूचक इशाराच सुप्रिया सुळे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे.

First Published on: March 1, 2023 3:23 PM
Exit mobile version