गोरेगावात 6 ते 9 डिसेंबरला होणार स्वराज्य भूमी कोकण महोत्सव

गोरेगावात 6 ते 9 डिसेंबरला होणार स्वराज्य भूमी कोकण महोत्सव

मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथील नेसको मैदानात ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोकणभूमी प्रतिष्ठान, मी मुंबईकर अभियान या संस्थांच्या माध्यमातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 6 डिसेंबर ते शुक्रवार 9 डिसेंबर 2022 या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. या महत्सोवाच्या पार्श्वभूमीवर कोकणचा धगधगता इतिहास पाहण्यासाठी मुंबईकरांसह कोकणवासियांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा आमदार आणि विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. (Swarajya Bhoomi Konkan Mahotsav will be held in Goregaon from December 6 to 9)

‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे उदघाटन मंगळवारी सकाळी 9 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सावाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, ज्यांनी आपल्या देशासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून योगदान दिले आहे, अशा थोर महात्म्यांचे पुण्यस्मरण व्हावे. त्यांचे कोकण व देशासाठीचे योगदान पुन्हा राज्यासमोर, देशासमोर अधोरेखित व्हावे या उद्देशाने या ठिकाणी संजय यादवराव व प्रसाद लाड यांच्या संयोजनातून स्वराज्यभूमी कोकण महोत्सव साजरा करत आहोत.

याचा उद्देश शेवटी मोठी लोकं असतात त्यांचे पुण्यस्मरण करणे, त्यांनी आपल्यासाठी जो काही त्याग केलाय, बलिदान दिलेय त्याची प्रेरणा घेऊन पुन्हा त्या मातीची महती वाढावी असा त्यामागचा उद्देश आहे. केवळ महती वाढावी एवढेच सीमित नाही तर कोकणच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी संजय यादवराव ग्लोबल कोकणच्या नावाने अनेक वर्ष उपक्रम राबवत आहेत. परंतु, गतीने त्याला आकार द्यायला हवा होता ते कमी पडले. म्हणून आम्ही ठरवले कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा ताकदीने स्वराज्य भूमीच्या मागे ताकदीने उभी राहील, असेही दरेकर म्हणाले.

“कोकणची आर्थिक संपन्नता, व्यवसाय वृद्धी कशी होईल यावर या परिषदेत उहापोह करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने राज्यातून या कार्यक्रमाला लोकं उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची इच्छा आहे केवळ कोकणापुरता हा स्वराज्य भूमी न राहता या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून, मातीतून राज्यासाठी, देशासाठी योध्ये दिलेत. त्यांचेही स्मरण झाले तर सर्वव्यापी कार्यक्रम होईल. त्यामुळे कोकण झाल्यावर विदर्भ, विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील सर्व स्वातंत्र्य सेनानी, योध्ये असतील त्यांचे स्मरण करावे अशा अर्थाने शासनाने पाठबळ दिले आहे. त्या अनुषंगाने हा कार्यक्रम कोकण भूमी प्रतिष्ठान आणि मी मुंबईकर अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे”, असे दरेकर म्हणाले.

“कोकणवर प्रेम करणाऱ्या सर्वाना आवाहन आहे जो धगधगता कोकणचा इतिहास आहे तो जिवंत करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा. कोकणच्या आर्थिक विकासाला, उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून गती देण्यासाठी प्रोत्साहित करावे”, असे आवाहनही यावेळी प्रवीण दरेकर यांनी केले.


हेही वाचा – हिंम्मत असेल तर माझ्यासमोर येऊन निवडणूक लढा; हेमंत गोडसेंचे संजय राऊतांना आव्हान

First Published on: December 3, 2022 8:39 PM
Exit mobile version