ताज हॉटेलमध्ये अतिरेकी घुसणार असल्याचा कॉल, तपासात निघाले सातारा कनेक्शन

ताज हॉटेलमध्ये अतिरेकी घुसणार असल्याचा कॉल, तपासात निघाले सातारा कनेक्शन

मुंबईतील सुप्रसिद्ध अशा पंचतारांकित ताज हॉटेलला सकाळच्या सुमारास आलेल्या एका कॉलमुळे मुंबई पोलिसांचे धाबे चांगलेच दणाणले. मुंबई पोलिसांच्या मोठ्या तारेवरच्या कसरतीनंतर या कॉलचे नेमके कनेक्शन शोधण्यामध्ये मुंबई पोलिसांना अखेर यश आले आहे. ताज हॉटेलमध्ये दोन बंदुकधारी अतिरेकी घुसणार असल्याचा कॉल ताज हॉटेलमध्ये आल्यानेच हॉटेल प्रशासनाची एकच खळबळ उडाली. त्यानंतर ताज हॉटेल प्रशासनाने मुंबई पोलिसांना या कॉलबाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांची संपुर्ण टीम धमकीच्या कॉलमुळे सतर्क झाली. त्यानंतर ताज परिसरातील पोलिस बंदोबस्तही वाढवण्यात आला. पण दिवसअखेर या कॉलच्या शोधाशोध मोहीमेमध्ये कॉल करणाऱ्या व्यक्तीचे साताऱ्याचे कनेक्शन आढळले आहे. अवघ्या १४ वर्षाच्या मुलाकडून हा धमकीचा आलेला कॉल खोटा असल्यावर शिक्कामोर्तब मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये या धमकीच्या कॉलनंतर संपुर्ण पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक या परिसरात कामाला लागले. या परिसरामध्ये कोणताही दहशतवादी किंवा बॉम्ब नाही हे मुंबई पोलिसांनी शोधून काढले. त्यानंतर या कॉलच्या ट्रेसिंगच्या कामाला मुंबई पोलिस लागली. दरम्यान हा कॉल शोधल्यानंतर साताऱ्यातील एका १४ वर्षीय मुलाने हा कॉल केल्याचे उघड झाले. हा धमकीचा फोन करणाऱ्या मुलाच्या वडिलांना मात्र या कॉलबाबत कोणतीही माहिती नसल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. कराडमधील एका मुलाने हा कॉल केल्याचे या संपुर्ण प्रकरणात उघड झाले आहे. या मुलाबाबतची अधिक चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. या कॉलबाबत ताज हॉटेल्समार्फत एक प्रसिद्धी पत्रकही काढण्यात आले होते. धमकीचा कॉल आला असल्याचे ताज हॉटेल्समार्फत स्पष्ट करण्यात आले होते. पण मुंबई पोलिसांच्या सर्च ऑपरेशननंतर मात्र हा कॉल खोटा असल्याचे निष्पन्न झाले.


 

First Published on: June 26, 2021 8:47 PM
Exit mobile version