नाशिक-मुंबई हायवे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्या : भुजबळ

नाशिक-मुंबई हायवे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्या : भुजबळ

संग्रहित छायाचित्र

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, मुंबई-नाशिक प्रवासासाठी लागणारा वेळ हा आता थेट पाच-सहा तासांवर जाऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

शहरातील रुंगटा बेलाविस्टा येथील सुविधा क्रिटीकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. यावेळी राज्यातील शिवभोजन केंद्र चालवणार्‍या संस्थांना शासनाकडून तीन महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने कष्टकरी, मजूर, गोरगरिबांच्या हितासाठी शिवभोजन ही अतिशय महत्वाची योजना सुरू केली होती. गोरगरीब जनतेच्या हितासाठी शासनाने ही सुरू ठेवावी, तसेच शिवभोजन केंद्र चालवणार्‍या संस्थांचे थकलेले अनुदान लवकरात लवकर अदा करण्यात यावे. याबाबत आपण अधिवेशनात मागणी करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुठले हिंदू सण साजरे होतात की नाही, असे वाटत होते. आता मात्र सर्व सण साजरे होतील असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, गेली दोन वर्षे जगभरात कोरोनाचे सावट होत. त्यामुळे कोणीही जास्तवेळ घराबाहेर पडू शकत नव्हते. एकत्र येऊ शकत नव्हते. ही परिस्थितीत देशात नाही तर संपूर्ण जगभरात होती. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनीदेखील लॉकडाऊनची घोषणा केली होती. सणवार साजरे करण्यासाठी खुद्द शासनाचीच नियमावली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांना कुठलाही अर्थ नाही. आता कोरोना आटोक्यात आल्याने सण उत्सवाला गर्दी होणारच असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज नाशिक शहरातील रुंगटा बेलाविस्टा येथील सुविधा क्रिटीकेअर हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध न्युरोसर्जेन डॉ संजय वेखंडे,हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल करवंदे, डॉ. सुरज मराठे, डॉ. संतोष घेगडमल, डॉ. विजय काकडे, डॉ. दीपक जगताप, डॉ. नवनाथ सानप, डॉ. प्रदीप जायस्वाल, डॉ. विशाल पगार डॉ. अखिल चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

First Published on: August 22, 2022 5:24 PM
Exit mobile version