दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार १३ तास ५० मिनिटे!

दूरदर्शन, आकाशवाणीवर राजकीय पक्षांना प्रचारासाठी मिळणार १३ तास ५० मिनिटे!

यापुढे होणार दूरदर्शन,आकाशवाणीवरून राजकीय पक्षांचा प्रचार

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी ६ राष्ट्रीय आणि ३ राज्यस्तरीय पक्षांसाठी प्रादेशिक दूरदर्शन वाहिनी आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी १३ तास ५० मिनिटांचा कालावधी (८१० मिनिटे) उपलब्ध करुन दिला जाणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्षाला ८ तास २२ मिनिटे आणि राज्यस्तरीय पक्षाला ५ तास २८ मिनिटांचा समावेश आहे. हा कालावधी संबंधित पक्षांना टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर प्रचार करताना त्यांना दिलेला कालावधी लक्षात घ्यावा लागेल. नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते मतदानाच्या दोन दिवस अगोदरपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल.

आयोगामार्फत ६ राष्ट्रीय आणि ३ राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचाराचे तास कसे असतील हे ठरवून देण्यात आले आहेत. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार आयोगाने दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना वेळ आखून दिला आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त असलेले पक्ष जेव्हा आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरुन करतील तेव्हा त्यांनी त्या संबंधित माहितीची किंवा भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याकडे देणे आवश्यक आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यामार्फत ती माहिती पडताळून पाहिली जाईल. या माहितीमध्ये निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध लिखाण असल्यास त्यातील काही वाक्य, संदर्भ किंवा परिच्छेद वगळणे बंधनकारक असेल.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करीत असताना प्रसारभारती महामंडळाला त्यांच्या प्रचारासाठी देण्यात आलेला वेळ, प्रचार साहित्य यांचे वेळापत्रक देणे आवश्यक असून त्याबाबत मान्यता घ्यावी लागेल. याशिवाय या पक्षांनी देश, जात-धर्म तसेच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका करु नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा –

‘दिवान बिल्डरला ४० टक्के फंड दिल्यामुळे पीएमसीवर निर्बंध’

First Published on: September 26, 2019 7:04 PM
Exit mobile version