लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, प्रचार सभांनी धरलेला जोर, मतदानाची लगबग यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या मतदानादरम्यान हे वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे एप्रिल महिन्यात तापमानातदेखील वाढ होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हवामानतज्ञांच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्याच्या शेवटी तापमान काही डिग्री सेल्सियसने वाढ होण्याची दाट शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अर्थात २३ एप्रिल रोजी जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, रायगड, पुणे, बारामतीसह नगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी मतदान होणार आहे.

याच काळात वरील सर्व भागांमधील तापमान ४२ ते ४४ डिग्री सेल्सियस राहील असा अंदाज राज्याच्या कृषी विभागाचे माजी सल्लागार आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. तर, महिना अखेरीस म्हणजे साधारण २७ ते ३० एप्रिलदरम्यान नंदुरबार, धुळे, दिंडोरीसह नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, मावळ, शिरूर, शिर्डी, मुंबई, ठाणे आणि रायगड या भागात अंदाजे ४० ते ४१ डिग्री तापमान राहील. २९ एप्रिल रोजी वरील सगळ्या भागांत मतदानाची प्रक्रिया पार पडणारप आहे.

त्यामुळे ऐन मतदानाच्या काळात मतदार, उमेदवार, निवडणुक ड्युटीसाठी तैनात असलेले अधिकारी या सर्वांनीच स्वत:ची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. सूर्य पृथ्वीच्या जवळ येणार असल्यामुळे तसंच कोरड्या हवेचा दाब वाढणार असल्यामुळे, राज्यात तापमान वाढेल असा अंदाज डॉ. रामचंद्र साबळे वर्तवला आहे. जनावरांच्या चारा छावण्यांकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. तसंच अनेक भागांत जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने निवडणूक काळात पाण्याची समस्या उद्भवू शकते, अशीही शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.