वैतरणा नदीला पूर, १० कामगारांची सुटका; तिघांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

वैतरणा नदीला पूर, १० कामगारांची सुटका; तिघांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

मुंबईसह राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांना पूराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अशातच या पुराच्या पाण्यात १३ कामगार अडकल्याच घटना पालघर जिल्ह्यात घडली. पालघरमधील वैतरणा नदीत बहाडोली येथे १३ कामगार अडकले. मुंबई वडोदरा महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना अचानक पूर आल्याने हे कामगार नदी पात्रात अडकले. विशेष म्हणजे या १३ कामगारांपैकी १० कामगारांची सुटका करण्यात आल्याची माहिती मिळते. (Ten workers of GR infrastructure were trapped in Vaitarna River in Palghar on July 13)

नदीपात्रात आलेल्या पूरात १३ कामगार अडकल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. तसेच, एनडीआरएफची टीमही दाखल झाली. या कामगारांच्या सुटकेसाठी पोलीस आणि एनडीआरएफचे जवान शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत १३ पैकी १० कामगारांची सुखरुप सुटका करण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या ४ जिल्ह्यांना पुढचे २ दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, पालघर, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा तर मुंबई, ठाण्याला ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाची संततधार कायम असल्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.


हेही वाचा – राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद

First Published on: July 14, 2022 8:35 AM
Exit mobile version