त्या फाइल्स नेमक्या कोणाच्या? फडणवीसांच्या ट्वीटवरून ठाकरे गटाचा निशाणा

त्या फाइल्स नेमक्या कोणाच्या? फडणवीसांच्या ट्वीटवरून ठाकरे गटाचा निशाणा

उध्दव ठाकरे

 

मुंबईः ‘त्या’ फोटोत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमक्या कोणाच्या फाईल्सवर सह्या करत आहेत. रोजगार, पाणी, शेतकरी किंवा नागरी समस्यांच्या या फायली आहेत का?, असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

मिशन नो पेंडन्सी असे टॅग करुन देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील फायलींचा निपटारा करत असल्याचा फोटो काही दिवसांपूर्वी ट्वीट केला होता. या फोटोवर दैनिक सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. भाजप पक्ष व त्यांचे नेते एक नंबरचे नौटंकी आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोत फडणवीस हे फायली क्लिअर करताना दिसत आहे. खरं तर मंत्रालयात कामाचा डोंगर साचला आहे. त्या डोंगरावर फडणवीस हे आक्रमण करत आहेत. पण या फायली नेमक्या कोणाच्या आहेत?. पायाभूत सुविधा, रोजगार, पाणी, शेतकरी यांच्या विषयीच्या त्या फायली आहेत का?, असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

पाणी प्रश्नी आंदोलन करणारे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरुनही ठाकरे गटाने फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अहो फडणवीस महाशय, फायलींचा ढिगारा निपटारा करतानाचा फोटो तुम्ही शेअर करता. त्या फायलींमध्ये अकोल्याच्या पाणी प्रश्नाची फाईल आहे का?, तेवढे काय ते बोला, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

नितीन देशमुख हे लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन करणारे लोकप्रतिनिधी आहेत. ‘मिंधे’ गट देशमुखांना गुवाहाटीला घेऊन गेला होता. मोठ्या शिताफीने त्यांनी स्वतःची सुटका करुन घेतली. खऱ्या शिवसेनेवर त्यांची निष्ठा आहे. त्याची शिक्षा मिंधे सरकार अकोल्याच्या जनतेला देत आहे का?, असा आरोप अग्रलेखातून करण्यात आला आहे.

विर्दभातील नेते हेच तेथील जनतेचे खरे शत्रू आहेत. अशा राज्यकर्त्यांच्या घशात तेच खारे पाणी ओतायला हवे. मंत्रिमंडळात गुलाबी मंत्री आहेत. त्यांनीच पाण्याच्या नावावर पाण्यासारखा पैसा ओढला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार उघडपणे सुरू आहे. त्या भ्रष्टाचाराची फाईल देवेंद्र महोदयांच्या टेबलावरील डोंगरात आहे काय?, याकडेही अग्रलेखात लक्ष वेधण्यात आले आहे.

First Published on: April 21, 2023 9:38 AM
Exit mobile version