ठाकरे गटाच्या एम.के.मढवींना दिलासा! तडीपारीचा निर्णय न्यायालयाकडून रद्द

ठाकरे गटाच्या एम.के.मढवींना दिलासा! तडीपारीचा निर्णय न्यायालयाकडून रद्द

नवी मुंबई : नवी मुंबईच्या ऐरोली येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे समर्थक व माजी जेष्ठ नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी (एम.के) यांच्यावर ऑक्टोंबर २०२२ मध्ये दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मढवी यांनी आपल्यावर राजकीय सूडात्मक भावनेतून ही कारवाई केल्याचा आरोप केला होता. या विरोधात मढवींनी या निर्णया विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निर्णय देत तडीपारीचा निर्णय रद्द केला आहे. ठाकरे गटाचे एम.के.मढवी यांना चार महिन्यानंतर दिलासा दिल्याने शिंदे गटाला हा मोठा झटका बसल्याची राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.तर पोलिसांना देखील न्यायालयाने चपराक दिली आहे, अशी चर्चा सुरु आहे. (Thackeray Group MK Madhvi Court)

नवी मुंबईतील गोठीवली गावात एम. के. मढवी आणि परिवार वास्तव्यास आहेत. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ठाकरे गटात राहण्याचा निर्णय एम.के.मढवी यांनी घेतला होता. मढवी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गणेशोत्सव काळात गुन्हे दाखल झाल्याने अडचणीत भर पडली होती.तर एका पत्रकार परिषदेत मढवी यांनी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत शिंदे गटात येत नसल्याने आपल्याला पोलिसच धमकी देत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात एम.के.मढवी यांना मुंबई शहर, ठाणे जिल्हा, रायगड आणि मुंबई उपनगर या चार जिल्हयातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

आपल्याला झालेली कारवाई ही राजकीय सुडात्मक द्वेषी भावनेतून झाल्याचे मढवी यांनी यावेळी स्पष्ट केले होते. या निर्णया विरोधात मढवी यांनी न्यायालयात धाव घेतली होती आज २१ फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मढवींच्या तडीपारीचा निर्णय रद्द केला आहे. मढवी हे नवी मुंबईतील एक अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या पत्नी विनया मढवी ज्येष्ठ नगरसेविका असून मुलगा करण मढवी मागील निवडणुकीत ऐरोलीतून निवडूण आले होते. आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने क्लिन चीट दिल्याने मढवींच्या माध्यमातून आगामी कालावधीत ठाकरे गटाचे ऐरोली विधानसभा मतदार संघात वजन वाढणार आहे.

न्यायालयाने दिलेला निर्णय हा सत्याच्या बाजूने दिला आहे. ज्यांनी मला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांना देव सद्दबुध्दी देवो.यापुढे देखील नागरिकांच्या समस्यांची सोडवणुक करण्यावर माझा भर राहील.
-एम.के.मढवी,माजी नगरसेवक


हेही वाचा – कोश्यारींचा दावा योग्य, ठाकरेंच्या इगोमुळे पत्राचा फॉरमॅट..; देवेंद्र फडणवीसांची टीका

First Published on: February 21, 2023 7:50 PM
Exit mobile version