सोशल डिस्टन्सिंग राखत गणरायाचे आगमन

सोशल डिस्टन्सिंग राखत गणरायाचे आगमन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी चार दिवस अगोदरच गणेशमूर्ती घरी आणण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून केले आहे. मात्र त्यापूर्वीच काही मूर्तीकारांनी भाविकांना गणेश मूर्ती घरी नेण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळे व घरगुती गणरायाचे सोमवारीच आगमन झाले आहे. काही भाविकांनी मूर्ती नेण्यास नकार दिला असला तरी मूर्तीकारांनी 20 तारखेपर्यंत गणेशमूर्ती नेण्यासाठी नागरिकांना सांगण्यात येत आहे.

दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्रीपासून गणरायाचे धूमधडाक्यात आगमन केले जाते. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर अनेक निर्बंध आले आहेत. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सरकारकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तीकारांनीही गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना सोमवारपासूनच गणेशाची मूर्ती घरी नेण्यास सांगितले आहे. त्यामुळे सोमवारपासूनच अनेक घरांमध्ये व सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचे आगमन झाले आहे. सोमवारी पाऊस असल्याने गणरायाला घरी नेणार्‍या भाविकांचे प्रमाण कमी असले तरी मंगळवारपासून त्यामध्ये वाढ झाली आहे.

लालबागमधील गणेश मूर्ती बनवणारे अतुल सागर आर्ट्स या कारखान्याचे मालक सागर पांचाळ यांनी त्यांच्याकडे मूर्ती बुकिंग केलेल्या भाविकांना 18 ते 20 ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये आपल्या मूर्ती नेण्यास सांगितले आहे. शुक्रवारी किंवा शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्ती नेण्यासाठी भाविक आल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. गर्दी झाल्यावर पोलिसांकडून कारवाई झाल्यास कोणालाच मूर्ती मिळणार नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखत किमान यावर्षी दिलेल्या तारखेलाच गणेश मूर्ती नेण्यात याव्यात, अशी विनंती अतुल सागर आर्ट्सचे सागर पांचाळ यांनी भाविकांना केली. भाविकांनी त्यांची विनंती मान्य करत सोमवारपासूनच गणरायाला घरी नेण्यास सुरुवात केली. सोमवारी 15 जणांनी गणरायाला घरी नेले. तर मंगळवारी हा आकडा वाढल्याचे पांचाळ यांनी सांगितले.

लवकर मूर्ती नेण्यास विरोध
अनेकांची घरे लहान असून, काहींची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे नागरिकांकडून मूर्ती नेण्यास विरोध होत आहे. परंतु कोरोनाची पार्श्वभूमी समजून सांगितल्यावर नागरिक समजून घेत असल्याचे मूर्तीकारांकडून सांगण्यात येत आहे. त्यातही ज्यांच्या घरामधील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, अशा तीन घरांमध्ये वर्षश्राद्ध असल्याने त्यांना आम्ही 21 ऑगस्टला मूर्ती नेण्याची परवानगी दिली असल्याचे सागर पांचाळ यांनी सांगितले.

लालबागमधील मूर्तीकारांच्या ऑर्डरमध्ये घट
लालबागमध्ये टिटवाळा, डोंबिवली, दिवा, ठाणे, बोरिवली, अंधेरी येथून मोठ्या प्रमाणात मूर्ती नेण्यास नागरिक येत असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रेन व बसमधून प्रवास करणे शक्य नसल्याने ग्राहकांनी स्थानिक ठिकाणी असलेल्या मूर्तीकारांकडूनच मूर्ती घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यंदा लालबागमधील मूर्तीकारांकडील गणेश मूर्तीच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे.

First Published on: August 19, 2020 7:06 AM
Exit mobile version