जगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प 

जगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प 

रविवारी रात्रीपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे खेड मध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून दापोली आणि मंडणगड तालुक्यांचा संपर्क सोमवारी सकाळपासून तुटला आहे. शहरातील मटण, मच्छी मार्केटमध्ये पाणी भरले आहे. खेड बाजारपेठेमध्ये पुराचे पाणी केव्हाही शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर पावसामुळे जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरून होणारी वाहतूक सोमवारी सकाळीपासूनच रोखण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

काल रात्रीपासून खेड तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आला असून खेड बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील सुर्वे इंजिनिअरिंग परिसरात नारंगी नदीचे पाणी मुख्य मार्गावर आल्याने दापोली आणि मंडणगड तालुक्यांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच शहरातील मटण ,मच्छी मार्केटमध्ये देखील पाणी शिरल्याने बाजारपेठेला पुराचा धोका निर्माण झाला आहे. खेड नगर परिषदेने पुराच्या शक्यतेने शहरातील व्यापार्‍यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मच्छी मार्केट परिसरातील जवळपास ८ ते १० दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान देखील झाले आहेत. बाजारपेठेतील मच्छी मार्केट परिसरात लोकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी देखील केली होती.

एसटी बसेस रद्द
दापोली आणि चिपळूण मार्गावरील एसटी बसेस रद्द करण्याचे आदेश खेड तहसीलदारांनी दिलेले आहेत. नारंगी नदीला पूर आल्याने खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
मुंबई -गोवा महामार्ग आज सकाळपासून जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे पूर्णपणे ठप्प झाला आहे. येथील ब्रिटिशकालीन पूल हा वाहतुकीसाठी धोकादायक असल्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी घेत खेड पोलिसांनी या पुलावरील वाहतूक आज सकाळपासूनच रोखलेली आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये या पुलावरील वाहतूक रोखण्याची ही तब्बल चौथी वेळ आहे. येथील नवीन पूल जोडरस्ता खचल्यामुळे अद्याप वाहतुकीसाठी खुला केलेला नसल्याने वाहनधारकांचे अधिकच हाल होत आहेत.

परशुराम घाटात दरड कोसळली
रत्नागिरीतील संगमेश्वर, चिपळूण तालुक्यांना सोमवारी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपले. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सह्याद्री खोर्‍यातील 32 गावात मुसळधार पाऊस सुरू असून त्यांचा संपर्क तुटला आहे. तर परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला असून तिथली वाहतूक वळविण्यात आली.

First Published on: July 16, 2019 5:46 AM
Exit mobile version