मुंबई उच्च न्यायालयाकडून शिंदे गटाला धक्का, सदा सरवणकरांची मध्यस्थी याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाकडून शिंदे गटाला धक्का, सदा सरवणकरांची मध्यस्थी याचिका फेटाळली

मुंबई – शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेलंय. परवानगी नाकारल्याने शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी उच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही मध्यस्थी याचिका फेटाळली आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याबाबत पुढे काय निकाल लागतो याकडे अवघ्या मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

हेही वाचा – ठाकरे आणि सरवणकर समर्थक आमनेसामने; माहिम आणि धारावीत जोरदार राडा

शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी मिळू नये. कारण शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी महापालिकेत अर्ज केला होता. अनिल देसाई हे सध्या कोणत्याच पदावर नाहीत. त्यामुळे त्यांना अर्ज करण्याचा अधिकार नाही, असं सदा सरवणकरांनी या याचिकेत म्हटलं होतं. या याचिकेवर आज शिवसेनेच्या याचिकेसोबतच सुनावणी घेण्यात आली. तेव्हा उच्च न्यायालयाने सदा सरवणकरांची मध्यस्थी याचिका फेटाळली. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. सर्व पक्षकारांच्या बाजूने युक्तीवाद पूर्ण झाला आहे. आता उच्च न्यायालयाकडून निकालाचं वाचून सुरू आहे. यावेळी कोर्टाने सदा सरवणकरांची मध्यस्थी याचिका फेटाळून लावली. त्यामुळे मुंबई उच्चन्यायालय आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी कोणाला परवानगी देते किंवा मुंबई पालिकेचा निर्णय कायम ठेवला जातोय का हे पाहावं लागेल.


काय आहे प्रकरण?

दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेची परवानगी मिळविण्यासाठी २२ ऑगस्ट रोजी पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानंतर शिंदे गटाने ३० ऑगस्ट रोजी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता परवानगी अर्ज जी/ उत्तर विभाग कार्यालयाला सादर केला होता. नंतर शिवसेनेतर्फे पालिकेला दोन वेळा स्मरणपत्रही पाठविण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटातर्फे मिलिंद वैद्य यांनी स्वतः जी/ उत्तर कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी पालिका विधी खात्याकडून अभिप्राय मागविला असून तो आल्यानंतर परवानगीबाबत कळविण्यात येईल, असे जुजबी उत्तर देत उद्धव ठाकरे गटाची बोळवण केली होती. मात्र तरीही मिलिंद वैद्य यांनी, पालिकेकडून परवानगी मिळो अथवा न मिळो शिवसेनेचा मेळावा होणार म्हणजे होणारच, मात्र पक्षप्रमुख जेथे सांगतील तेथे हा मेळावा घेण्यात येईल, असे सांगितले होते.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या सभेवर भाजपचा निशाणा; आशिष शेलारांनी ट्विटरद्वारे सेनेवर प्रश्नांचा भडिमार

मात्र आता पालिका जी/ उत्तर विभाग कार्यालयाने पोलिसांच्या हवाल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे कारण देत दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव गटाला व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान पालिकेकडून मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे.

First Published on: September 23, 2022 4:12 PM
Exit mobile version