अकरावी प्रवेश प्रक्रियेलाही बसणार कोरोनाचा फटका

अकरावी प्रवेश प्रक्रियेलाही बसणार कोरोनाचा फटका

करोनामुळे प्रथम शाळा बंद व त्यानंतर दहावीच्या परीक्षेचा पेपर पुढे ढकलण्यात आला. याचा परिणाम दहावीच्या निकालावर होणार असला तरी अकरावी प्रवेशालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरवर्षी दहावीची परीक्षा झाल्यावर प्रशिक्षण, नोंदणी आणि पुस्तकवाटप केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे बिघडलेले परीक्षेचे वेळापत्रक आणि बंद असलेल्या शाळा यामुळे यंदा अकरावीचे तीनतेरा वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दहावीच्या निकालानंतर लगेचच पालकांची अकरावी प्रवेशाची तयारी सुरू होते. यंदा करोनामुळे दहावीचा एक पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. पण हा पेपरही रद्द करावा अशी मागणी आता शिक्षकांकडून होत आहे. परीक्षा होणार की नाही यासंदर्भात राज्य मंडळाने निर्णय जाहीर केलेला नाही.

दरवर्षी एप्रिलमध्ये अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची तयारीला शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत सुरुवात होते. शिक्षक, मुख्याध्यापक यांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर नवीन कॉलेज, वाढीव जागा यांची माहिती संकलित करण्यात येते. यंदा मात्र ऐन परीक्षेतच करोनामुळे सर्व अंतिम शैक्षणिक सत्र गोंधळात आहे. याचा फटकाही आता सर्वच प्रवेशांना बसणार आहे.

दरवर्षी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी यंदा फेब्रुवारीमध्येच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून कॉलेज नोंदणीला सुरुवात केली होती. विद्यार्थी प्रवेश आणि ऑनलाइन प्रवेशाचे नियम याबाबत मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले की, मार्गदर्शन केंद्र तसेच शाळेत विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका वाटप केली जाते. त्यानंतर एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात प्रत्यक्ष अर्जाचा पहिला टप्पा भरण्याची संधी दिली जात होती. यंदा मात्र हिच प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि त्याचा थेट परिणाम प्रवेशावर होईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.

First Published on: April 6, 2020 7:10 AM
Exit mobile version