महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?, उद्धव ठाकरे म्हणतात…

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?, उद्धव ठाकरे म्हणतात…

uddhav thackeray sanjay raut

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दैनिक सामनाला मुलाखती दिलीय. त्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांना हात घालत त्यावर आपली मतं व्यक्त केलीत. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ही खणखणीत मुलाखत घेतली आहे. 26 आणि 27 जुलैला दोन भागात ही मुलाखत दाखवली जाणार आहे.

मुलाखतीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला?, असा प्रश्न विचारला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा प्रयोग जर का चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. जनतेने उठाव केला असता. तसं झालं नाही, असंही अधोरेखित केलंय. जनता आनंदी होती, कारण आल्या आल्याच आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त केलं. त्यानंतर मी अभिमानाने सांगेन की, कोरोना काळात माझ्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांनी, प्रशासनाने आणि जनतेने उत्तम सहकार्य केलं. म्हणून आणि म्हणूनच देशातील ज्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं; असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

मी माझं नाव नाही म्हणत, पण जनतेचा मी प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. जर समजा या सगळ्यांनी सहकार्य नसतं केलं तर मी कोण होतो? मी एकटय़ाने काय केलं असतं? बरं, मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो. कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो, असंही त्यांनी सांगितलंय.

आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून बोंब मारताहेत

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवताहेत, बोंब मारताहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिलं हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोकं घडवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मी माझ्या तमाम शिवसैनिकांना, माताभगिनींना आणि बांधवांना विनंती करतो की, चला परत उठा. आता पुन्हा एकदा सामान्यांना असामान्य बनवूया. ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात. आणि माझा तर विश्वासघात केलाच, लोकांचा विश्वासघात करताना बाळासाहेबांबद्दल संभ्रम निर्माण कशाला करताय? तुम्ही स्वतःला मर्द वगैरे समजता ना? तुमचा मर्दाचा चेहरा घ्या, जा पुढे आणि मागा मतं, असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना आव्हान केलं आहे.


हेही वाचाः सडलेली पानं झडलीच पाहिजे, उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

First Published on: July 26, 2022 9:21 AM
Exit mobile version