बारावीच्या गुणांचे महत्व वाढणार

बारावीच्या गुणांचे महत्व वाढणार

इंजिनिअरिंग

बारावीनंतर विद्यार्थ्यांचा कल हा अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषध निर्माण शाास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे अधिक असतो. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असते. तसेच या सीईटीच्या गुणांवरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. त्यामुळे काही वर्षांपासून बारावीला अभ्यास करण्याकडे व अधिक गुण मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असताना दिसत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांनाच बसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सीईटीच्या गुणांबरोबरच बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

अभियांत्रिकी, वैद्यकीय व औषध निर्माण यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटीच्या माध्यमातून दरवर्षी समारे 4 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करतात. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांकडून बारावीची परीक्षा दिल्यानंतर लगेचच सीईटीच्या परीक्षेची तयारी करण्यात येते. परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश हे बारावीच्या गुणांवर न देता सीईटीच्या गुणांवर देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा कल बारावीमध्ये अधिक गुण मिळवण्याऐवजी सीईटीच्या परीक्षेत अधिक गुण मिळवण्याकडे वाढत आहे. पण याचा फटका विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशावेळी बसत आहे. कारण सीईटीच्या परीक्षेतील गुण समान आल्यावर प्रवेश देताना बारावीचे गुण त्याचप्रमाणे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजी या विषयांचे गुण पाहिले जातात. यामध्ये ज्याचे गुण अधिक असतील त्याला प्राधान्य दिले जाते.

परंतु बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे त्यांना अनेक चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सीईटीच्या गुणांबरोबरच बारावीच्या गुणांचेही महत्त्व कायम ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सीईटी परीक्षेचे गुण व बारावीचे गुण एकत्रित करून निकाल लावण्यासंदर्भात किंवा अन्य कोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल का याबाबत सरकार पडताळणी करत आहे. सीईटी परीक्षेचे गुण व बारावीच्या परीक्षेचे गुण एकत्रित दिल्यास प्रवेश घेताना दोन्ही गुणांचा विचार करण्यात येईल. त्यामुळे बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम राहण्यास मदत होईल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

First Published on: February 24, 2020 6:56 AM
Exit mobile version