कुख्यात टिप्पर गँगला अखेर मोक्का

कुख्यात टिप्पर गँगला अखेर मोक्का

अंबड येथील कुख्यात टिप्पर गँगवर लावण्यात आलेला मोक्का खटल्याचा आज (दि. २८) निकाल लागला. नाशिक जिल्हा न्यायालयाने टिप्पर गँगला मोक्काअंतर्गत शिक्षा सुनावली. तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी टिप्पर गँगच्या मुसक्या आवळल्या होत्या.
टिप्पर गँगवर झालेल्या कारवाईने नाशिककरांना मोठा दिलासा आहे.

अंबड पोलिसांनी २०१६ मध्ये मोक्का अहवाल सादर केला होता. तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होतेे. टोळीप्रमुख गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले, देवदत्त तुळशीराम घाटोळ, मुकेश दलपतसिंग राजपूत, शाकीर नासीर पठाण ऊर्फ मोठा पठाण, हेमंत बापू पवार ऊर्फ सोन्या अणि इतर संशयित आरोपींवर मोक्कान्वये दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, ३१ मे २०१६ रोजी फिर्यादी भावसार शुभम पार्क येथून पायी जात होते. त्यावेळी आरोपी आणि वसीम शेख, शाहीद सय्यद, फरहान शेख ऊर्फ दहशत यांनी संगनमत करत टिप्पर गँगचा मोठा पठाणने भावसार यास बोलावत त्याच्याकडे हप्ता मागितला. सायंकाळपर्यंत पाच लाख दे नाही तर आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी आरोपींनी दिली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या डोक्यास पिस्तूल लावत, ओरडलास तर खल्लास करून टाकेल असा दम दिला. तसेच आरोपीने त्याच्यावर लोखंडी रॉड, तलवारीने प्राणघातक हल्ला केला. त्याच्याकडील बळजबरीने रक्कम काढून घेतली होती. संशयितानी संघटितपणे कट रचून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था यांनी मोक्का कायद्यान्वये दोषारोप सादर करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार तपासी अधिकार्‍यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज या खटल्याचा निकाल लागला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुधीर कोतवाल यांनी कामकाज पाहिले.

First Published on: September 28, 2021 2:12 PM
Exit mobile version