राज्यातील अमर अकबर अ‍ॅन्थोनीचे सरकार पायात पाय घालून कोसळेल

राज्यातील अमर अकबर अ‍ॅन्थोनीचे सरकार पायात पाय घालून कोसळेल

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

राज्यातील अमर अकबर अ‍ॅन्थोनीचे महाविकास आघाडी सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून आपोआप कोसळेल, असे भाकित भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे यांच्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचा कारभार, दूध उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न आणि राम मंदिराच्या भूमिपूजनावरून चालेली वादळी चर्चा या मुद्द्यांवर दानवे यांनी मतप्रदर्शन केले व सरकारवर जोरदार शब्दांत टीकास्त्र सोडले. दानवे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांना अमर, अकबर, अ‍ॅन्थनीची उपमा दिली. ’महाराष्ट्रात अमर, अकबर, अ‍ॅन्थनीचं सरकार आहे आणि एकमेकांच्या पायात पाय घालणारे हे तिन्ही पक्षांचे सरकार आपोआपच पडेल. ते दुसर्‍या कुणी पाडण्याची गरज नाही’, असे दानवे म्हणाले.

दानवे यांच्याआधी देवेंद्र फडणवीस यांनीही अशाचप्रकारचे विधान केले होते. राज्यातलं सरकार आम्ही पाडणार नाही तर ते अंतर्विरोधातूनच पडेल, असे फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्यासोबतच भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनीही राज्यातलं कौरवांचं सरकार जाऊन लवकरच पांडवाचं राज्य येणार, असा दावा केला होता. फडणवीस सरकारमध्ये कृषीमंत्री राहिलेले रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनीही पुढच्या दोन महिन्यात हे सरकार कोसळणार असा दावा केला आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरूनही दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक सल्ला दिला. राम मंदिराच्या भूमिपूजनाचे निमंत्रण आले किंवा नाही आले तरी उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला जायला हवे, असे दानवे म्हणाले. पहले मंदिर, फिर सरकार अशी घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र, ’पहले सरकार फिर मंदिर’, असं सध्याचं त्यांचं चित्र आहे. राज्यातली स्थिती पाहता राम मंदिराच्या पायाभरणीला जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रमाणपत्र घ्यावं लागेल, असं दिसत असल्याचा टोला दानवे यांनी लगावला.

First Published on: July 22, 2020 7:04 AM
Exit mobile version