हैदराबाद महानगरपालिकेचे अधिकारी मुंबई महापालिकेच्या सेवासुविधा पाहून भारावले

हैदराबाद महानगरपालिकेचे अधिकारी मुंबई महापालिकेच्या सेवासुविधा पाहून भारावले

मुंबई : मुंबई महापालिकेमार्फत (Brihanmumbai Municipal Corporation) मुंबईकरांना दिल्या जात असलेल्या दैनंदिन सेवासुविधा पाहून हैदराबाद महापालिकेचे (Greater Hyderabad Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ भारावून गेले. त्यांनी मुंबई महापालिकेच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. तसेच, मुंबईतील काही चांगल्या सेवासुविधांची अंमलबजावणी हैदराबाद महापालिकेच्या हद्दीत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेच्या (BMC) दोन दिवसीय (२५ व २६ एप्रिल) भेटीवर आलेल्या पाच सदस्यीय शिष्टमंडळात हैदराबाद महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व्ही. ममता, उपआयुक्त व्ही. प्रशांती, पी. श्रीनिवास राव, अधीक्षक एस. सी. श्रीवास्तव आणि अधीक्षक हरीबाबू यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेचे विविध विभाग, प्रकल्प, तसेच एच/पश्चिम विभाग कार्यालय आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

पहिल्या दिवशी मुंबई महापालिका मुख्यालयात उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. त्यानंतर संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून मुंबई महापालिकेचे विविध विभागवार रचना, परिमंडळ रचना, उपनगरांची रचना, नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा यासह महापालिकेच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत संकलित केला जाणारा कचरा आणि त्यावर केली जाणारी प्रक्रिया, नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत करण्यात येणारी जनजागृती यांची संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता नितीन परब यांनी माहिती दिली. यावेळी प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे उपस्थित होते.

त्यानंतर या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी आपत्कालिन व्यवस्थापन विभागाचे कामकाज, नियंत्रण कक्ष, सुरक्षेबाबत नागरिकांना दिले जाणारे प्रशिक्षण, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) रश्मी लोखंडे यावेळी उपस्थित होत्या.

महापालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयादेखील शिष्टमंडळाने भेट दिली. सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी शिष्टमंडळाला विभागाच्या कामकाजासह घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. विभागातील वीजबिल भरणा पद्धत, पाणीबिल भरणा पद्धत यासह कररचना पद्धतीची माहिती शिष्टमंडळाने उत्सुकतेने जाणून घेतली. त्यांनतर, त्यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट दिली.

या शिष्टमंडळाचे पालिका उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी स्वागत केले. त्यांनी शिष्टमंडळाला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयासंदर्भात सविस्तर माहिती दिली. उद्यानातील विविध सोयी-सुविधा, प्राणिसंग्रहालय, स्मार्ट गांडूळखत सिस्टीम व सेंद्रीय शेती प्रकल्पालाही भेट दिली. उद्यानाची देखभाल व उद्यानाला भेटी देण्यासाठी आलेल्या नागरिकांना पुरवण्यात येणाऱया सेवा-सुविधांसह इतर गोष्टींचे शिष्टमंडळाने विशेष कौतुक केले.

First Published on: April 26, 2023 11:11 PM
Exit mobile version