पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळेची घंटा वाजणार

पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळेची घंटा वाजणार

राज्यात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढू नये आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन राज्यातील शाळा मागील १० महिन्यांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिकवले जात आहे. केंद्र सरकारने कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्यातील प्रशासनावर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली आहे. प्रत्येक राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरु कराव्या असा निर्णय केंद्र सरकारने दिला आहे. ९वी ते १२ वीच्या शुळा सुरु झाल्यावर आता पुण्यात ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

राज्यात ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु करण्याची परवानगी नोव्हेंबर २०२०मध्ये देण्यात आली आहे. तर आता पुण्यात ५ वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली असून तसे अधिकृत पत्रकही काढण्यात आले आहे.

पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा १ फेब्रुवारीपासून सुरु होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. चाचणीचे अहवाल हे शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना सादर करण आवश्यक केले आहे.

शाळेतील बैठक व्यवस्थेत बदल करुन शारीरिक अंतराच्या नियमांनुसार करण्यात येणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बसविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांची संमती घेतली जाणार आहे. ज्या ठिकाणी वर्ग भरविण्यात येणार आहेत. ते ठिकाण बंद खोल्यांचे नसावे. तर वर्ग भरविण्यात येणाऱ्या जागेवर हवा खेळती राहावी म्हणून दारे आणि खिडक्या या उघड्या ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

First Published on: January 23, 2021 12:21 PM
Exit mobile version