पुढील पाच दिवस सूर्य आग ओकणार; गरज असेल तरच घराबाहेर पडा

पुढील पाच दिवस सूर्य आग ओकणार; गरज असेल तरच घराबाहेर पडा

मुंबई : उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत होणाऱ्या बदलामुळे उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. पण आता पुढील पाच दिवसांत दोन ते तीन अंशाने पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे गरज असेल तरच दुपारी घराबाहेर पडा असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आता वाढत्या उष्णतेमुळे हवामान बदल होत आहेत. त्यामुळे आजारी नागरिक आजारी पडत आहेत. आधीच उष्णता खूप आहे, त्यात जर आणखी वाढ झाली तर उष्माघाताने आजारी पडणाऱ्यांची संख्याही वाढू शकते. त्यामुळे पाऊस कधी पडणार याची वाट पाहत आहेत. कारण गेल्या 15 दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ होत आहे. विदर्भ आणि मराठवाडाच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये तापमान कमी आहे, पण आद्र्रतेमुळे कोकण किनारपट्टीवर अधिक उकाडा जाणवत आहे. आज (18 मे) राज्यातील अमरावती आणि वर्धा या भागांमध्ये सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात पुढील पाच दिवसात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उष्माघाताने १२ हून अधिक जणांचा मृत्यू
वाढत्या उष्णतेमुळे यंदाचा उन्हाळा अधिक धोकादायक सिद्ध होताना दिसतो आहे. २०२२ मध्ये उष्माघाताच्या 767 रुग्णांची नोंद झाली होती. पण चिंतेची बाब अशी की, ही संख्या यावर्षी दुप्पट झाली आहे. यंदा उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रात यंदा उष्माघाताचे 1477 रुग्ण आढळून आले आहेत, तर 12 हून अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे.

अशी घ्या काळजी
वाढत्या उष्णतेमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना उष्माघाताचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खासकरून उन्हामध्ये  सतत काम करणाऱ्या नागरिकांच्या शरीराचं डिहायड्रेशन होऊन त्यांच्या मेंदूतील रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठून तीव्र झटका येण्याची शक्यता असते. यावेळी व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे मृत्यू टाळण्यासाठी आणि उष्णेतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी गरज नसल्यास दुपारी उन्हामध्ये घराच्या बाहेर पडू नका. डिहायड्रेशन टाळण्यासाठी सतत पाणी प्या किंवा फळांचे ज्यूस, नारळ पाणी, ओआरएसचे पाणीही पिता येऊ शकते. डोक्यावर टोपी घाला, रुमाल बांधा आणि डोळ्यांवर गॉगल लावा. सध्याच्या वातावरणामुळे तीव्र स्वरुपाची डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

First Published on: May 18, 2023 6:37 PM
Exit mobile version