महिला असुरक्षितेबाबत युवती सेना महिला आघाडीने घेतली राज्यपालांची भेट

महिला असुरक्षितेबाबत युवती सेना महिला आघाडीने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घडलेल्या दुर्दैवी घटना पाहता संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालावी लागली. महाराष्ट्रातही महिलांवर अत्याचार, बलात्कार होणे, महिला, तरुण मुली बेपत्ता होणे, त्यांना फूस लावून पळवून नेणे यांसारख्या घटना मोठया प्रमाणात घडत आहेत. राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या घटनांची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेबाबत ठोस पावले उचलावीत. तसेच, राज्यात शक्ती कायद्याची कडकपणे आणि तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी युवती सेना महिला आघाडीच्या वतीने राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मणिपूरसह मुंबई, महाराष्ट्रात संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. मणिपूरमध्ये तर महिलांची विवस्त्र करून निर्लज्जपणे धिंड काढण्यात आली. त्यामुळे देशाची मान शरमेने खाली गेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यात 5,510 मुली, महिला बेपत्ता झाल्या आहेत. मात्र मणिपूरच्या घटनेबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा तोंड उघडले नाही. दुसरीकडे, सत्ताधारी भाजप ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ असा नारा देशाला देत आहे. तर पंतप्रधान मोदी हे मुस्लिम भगिनींकडून राखी बांधून घेण्याचे आवाहन हिंदू तरुणांना करीत आहेत. मात्र महाराष्ट्रासह देशात ज्या महिला, तरुणी यांच्यावर अत्याचार घडत आहे, तो अत्याचार रोखण्यासाठी व दोषींना कडक शिक्षा करण्यासाठी महाराष्ट्रात सत्तेवर असताना शिवसेनाप्रणित महाविकास आघाडी सरकारने ‘शक्ती’ कायदा मंजुरीसाठी पाठवला असून त्यास केंद्र सरकारने अद्यापही मंजुरी दिलेली नाही, असा संताप युवती सेना महिला आघाडीतर्फे शिष्टमंडळाकडून व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा : मोदींवरील टीकेचा परिणाम; काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी लोकसभेतून निलंबित

सरकारला इशारा

या गंभीर प्रकरणी राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन योग्य तो तोडगा न काढल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करून सरकारला चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारण्यात येईल, असा इशारा यावेळी युवती सेना व महिला आघाडीच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे.

हेही वाचा : Flying kiss : पंतप्रधानांना चोळी-बांगडीचा आहेर पाठवण्याची हिंमत स्मृती इराणी करतील का? ठाकरे गटाचा हल्लाबोल

यावेळी, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उप नेत्या मिनाताई कांबळी, माजी महापौर श्रद्धा जाधव, माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत, पक्ष प्रवक्त्या संजना घाडी, माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर, माजी नगरसेविका अंजली नाईक, युवासेना कार्यकारिणी सदस्या शीतल शेठ देवरुखकर, सुप्रदा फातर्पेकर , राजोल पाटील, धनश्री कोलगे, उपसचिव युवासेना रेणुका विचारे, लायना रामगिरी युवती, वैष्णवी चव्हाण ठाकूर, प्रियांका गोकर्णे, ज्योती ठाकरे, दीपमाळा बडेकर, पद्मावती शिंदे विभाग संघटीका, युगंधरा साळेकर महिला विभागप्रमुख, विभाग प्रमुख संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

First Published on: August 10, 2023 10:27 PM
Exit mobile version