सप्तशृंगी मंदिरात चोरी; २० दिवस उलटूनही अद्याप गुन्हाही दाखल नाही की कोणाला कानोकान खबरही नाही

सप्तशृंगी मंदिरात चोरी; २० दिवस उलटूनही अद्याप गुन्हाही दाखल नाही की कोणाला कानोकान खबरही नाही

नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या  नाशिक जिल्ह्यातील वणीच्या सप्तशृंगी देवस्थानात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. सप्तशृंगी देवी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरी करणाऱ्या चोरट्यांनी मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना लावून ही चोरी केली आहे. तर दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या आढळून आल्या आहे.

यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरीची घटना १३ फेब्रुवारी रोजी घडली होती. घटना घडून जवळपास २० दिवस उलटल्यानंतर हा सर्व प्रकार उजेडात आला आहे. तसेच या चोरीबाबत २० दिवस उलटूनही अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, विश्वस्त ऍड. दीपक पाटोदकर यांनी संस्थान अध्यक्षांना तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्र दिले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार चोरीची घटना १३ फेब्रुवारीला घडली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चुना फासत ही चोरी करण्यात आली आहे. दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या अनेक नोटा जळालेल्या अवस्थेत मिळून आल्या. सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही असतानाही ही चोरी कशी झाली? त्यामुळे गडावरील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल आता कधी गुन्हा दाखल होतो आणि काय पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यभरातील काही प्रमुख मंदिरांमधील सप्तशृंगी मंदिर हे एक प्रमुख मंदिर आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेसाठी मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. तर सुरक्षारक्षक देखील आहेत. असे असतानाही चोरट्यांनी थेट देवीच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला आहे. यामुळे संशय वाढला आहे. ही चोरी बाहेरून आलेल्यांनी की मंदिर परिसरातीलच कुणी परिचितांनी केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच या चोरीच्या घटनेनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आहे. या प्रकरणी पोलीस कारवाई होणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

First Published on: March 4, 2023 4:28 PM
Exit mobile version