राणे नगर सारख्या भरवस्तीत चोरी; दुकानातील मोबाईल, रोकड लंपास

राणे नगर सारख्या भरवस्तीत चोरी; दुकानातील मोबाईल, रोकड लंपास

नाशिक :  सिडकोतील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा धाकच उरला नसल्याचा आरोप होत आहे. गुरुवारी पहाटे राणे नगर येथे एका मोबाईलच्या दुकानात शटर वाकवून चोरट्याने मोबाईल व रोख रक्कम लंपास केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या सततच्या घडणाऱ्या घटना नागरिकांसाठी दहशत पसरवत आहे. कधी घरफोडी, कधी सोनसाखळी चोरी, तर कधी दुचाकी चोरी, तर कधी किरकोळ घडणाऱ्या चोरीच्या घटना जणू पोलिसांना आव्हान देत आहेत. इतक्या घटना घडूनही पोलिसांना मात्र चोर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वीच संजीव नगर येथे चोरट्याने मोबाईल दुकान फोडून तब्बल ३१ मोबाईल लांबविले होते. तर गुरुवारी पहाटे राणे नगर येथे वेद मोबाईल शॉप येथून ६ मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली. याबाबत निशांत मुकणे यांनी अंबड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने नागरिकांनी पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला आहे.

अंबडचे गुन्हे शोध पथक संशयाच्या भोव-यात 

अंबड पोलिसांची कुठेही गस्त होत नसल्याचा आरोप होत असून महत्त्वाची भूमिका असणारे डीबी म्हणजे गुन्हे शोध पथक सध्यस्थीती संशयाच्या भोव-यात अडकलेले दिसत आहे. रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना वाढत असताना हे पथक झोपा काढतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर या सर्व विषयावर वरिष्ठ निरीक्षकांचा धाकच नसल्याने त्यांची निष्क्रियता उघड होत असून अंबड ला सक्षम आधिका-याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

First Published on: August 4, 2022 1:23 PM
Exit mobile version