विक्रमगडमधील आदिवासी पाडे पंधरा दिवसांपासून अंधारात

विक्रमगडमधील आदिवासी पाडे पंधरा दिवसांपासून अंधारात

Electricity

विक्रमगड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत क्षेत्रातील जाधवपाडा व नवापाडा या आदिवासी वस्ती असलेल्या पाड्यांची गेल्या पंधरा दिवसापासून महावितरण विक्रमगड यांनी विद्युत खंडीत केल्याने त्यांना अंधारात राहावे लागते आहे. जाधवपाडयातील 32 घरे व नवापाडा 28 घरांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी गेल्या पंधरा दिवसांपासून गावकरी अंधारात आहेत. गावकरी गेल्या आठ महिन्यापासून वीज बिल न आल्याने बिले भरू शकले नाहीत. त्यामुळे महावितरणच्या कर्मचार्‍यांनी दोन्ही आदिवासी पाड्याचा वीज पुरवठा खंडीत केला असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पाड्यांत जून 2019 पासूनच वारंवार विद्युत खंडीत होत असल्याचे प्रकार घडलेले आहेत. सर्वच्या सर्व गावकर्‍यांनी थकीत वीज बिले भरली आहेत. बिले घेऊन त्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांची भेटही घेतली होती. पण, कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वीज बिल भरणा करूनसुध्दा विद्युत कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील आदिवासी पाड्यातील जनता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

खडकीपैकी जाधवपाडा, नवापाडा या पाड्यातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असते. आता पंधरा दिवसापासून वीज पुरवठा बंद आहे. थकीत बिले भरल्यानंतरही वीज पुरवठा सुरु करण्यात आलेला नाही. त्यामुळे किती दिवस अंधारात बसणार. आंदोलनाशिवाय आता पर्याय नाही.
– सोन्या यशवंत वंजारा, वीज ग्राहक

जाधवपाडा आणि नवापाडा गावांना वितरीत होणार्‍या वीज पुरवठा लाईनचे काम करताना ठेकेदाराकडून लाईन कट करण्यात आली असल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तो लवकरच सुरळीत केला जाईल.
– प्रशांत कराळे, शाखा अभियंता, महावितरण विक्रमगड

First Published on: January 20, 2020 1:55 AM
Exit mobile version