कर्जतला कार-रिक्षा अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू

कर्जतला कार-रिक्षा अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू

कार आणि रिक्षा यांच्या भीषण अपघातात रिक्षाच्या सीएनजी टाकीचा स्फोट झाल्याने चालक आणि दोन महिलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 3 वाजता कर्जत-कल्याण राज्य मार्गावर डिकसळ येथील सिद्धीविनायक हॉस्पिटलसमोर घडली.

रिक्षा (एमएच 05 सीजी 4351) नेरळकडून कर्जतकडे जात असताना समोरून येणार्‍या कारची (एमएच 01 सीजे 2948) समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यात दोन्ही वाहनांनी क्षणार्धात पेट घेतला. स्थानिकांनी या अपघाताची पोलीस आणि नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यामुळे सर्व यंत्रणा अपघातस्थळी काही वेळातच दाखल झाल्या. मात्र रिक्षाच्या सीएनजी टाकीचा झालेला स्फोट आणि कडक ऊन यामुळे यंत्रणा पोहचण्यापूर्वीच दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. कारमधील दोघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही दोन्ही वाहने वेगात जात असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

या अपघातात सरिता मोहन साळुंके (रा. नेरळ), सुभाष जाधव आणि शुभांगी सुभाष जाधव (रा. बदलापूर) यांचा होरपळून मृत्यू झाला. यापैकी दोन्ही महिला या बहिणी असून, सुभाष हा शुभांगीचा पती आहे. ऐन धूलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे वृत्त समजताच डीवायएसपी अनिल घेरडीकर आणि पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

राज्यमार्ग बनला मृत्यूचा सापळा

ठेकेदाराने अर्धवट काम केल्याने मागील काही दिवसांत कर्जत-कल्याण राज्यमार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर रस्ता दुभाजक आणि स्पीडब्रेकरची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात आलेली असतानाही बांधकाम विभागाने त्याबाबत गांभीर्य दाखविलेले नाही. त्यामुळे या मार्गावर आणखी किती बळी जाणार, असा संतप्त सवाल या दुर्घटनेनंतर अनेकांनी उपस्थित केला आहे.

First Published on: March 29, 2021 11:55 PM
Exit mobile version