हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट बंदोबस्त, १२ दिवसांत निघणार ६०हून अधिक मोर्चे

हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट बंदोबस्त, १२ दिवसांत निघणार ६०हून अधिक मोर्चे

नागपूर – दोन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन होत असल्याने विधान भवन परिसरात छावणीचे स्वरुप आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव १० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अत्याधुनिक पाच सुसज्ज दक्षता वाहने, गृहरक्षक दलाचे एक हजार जवान, बारा बॉम्बशोधक-नाशक पथके तैनात करण्यात आली आहेत. पुढील १२ दिवसांत तब्बल ६० मोर्चे निघणार असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा – आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; विरोधक-सत्ताधारी सज्ज, कोणते मुद्दे गाजणार?

यंदाचे नागपूरमध्ये होत असलेले हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. वादळी ठरलेल्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात विविध मुद्दे नव्याने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या नव्या मुद्द्यांवर आता हिवाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनीही या अधिवेशनासाठी कंबर कसली असल्याने पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच हिवाळी अधिवेशनही दणाणून सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करता मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा – राज्यात नवीन लोकायुक्त कायदा करणार, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्याच्या राजकारणासाठी मुंबईप्रमाणेच नागपूरसुद्धा मध्यवर्ती केंद्र ठरले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विविध मागण्यांसाठी अनेक संघटना नागपूरच्या विधान भवन परिसरात मोर्चे घेऊन धडकण्याची शक्यता आहे. ६० हून अधिक मोर्चे विधान भवनावर येऊ शकतात. त्यामुळे विधान भवन, नाग भवन, आमदार निवास, रविभवन परिसर व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बारकोड पद्धतीचा अवलंब करण्याचे संकेत दिले आहेत.

कोरोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे नागपूरला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होऊ शकले नाही. आता कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याने नागपूर अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार उत्साह आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून अधिवेशनानिमित्त येणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या स्वागतासाठी संत्रानगरी सज्ज झाली आहे. पोलीस प्रशासनाने विधान मंडळ परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

First Published on: December 19, 2022 8:16 AM
Exit mobile version