पाऊस, अंधार, भूक, भीतीच्या सावटाखाली ते १७ तास

 पाऊस, अंधार, भूक, भीतीच्या सावटाखाली ते १७ तास

मुसळधार पावसामुळे उल्हासनगर शहरात पूर

पावसाने तहान मिटवली पण भुकेचं काय?

मुसळधार पावसाचा प्रकोप ठाणे जिल्ह्याने शनिवारी अनुभवला. बदलापूर-वांगणी दरम्यान पुराच्या पाण्यात महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकून पडली. एनडीआरफ नौदल हवाई दल पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने हजारो प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. तब्बल 1७ तासांचा थरार अंगावर काटा आणणारा होता. अंधारलेल्या रात्रीत चमकणारी वीज तेवढ्या काळापुरता प्रकाश, पुढे खोल गडद अंधारच अंधार, कोसळणारा, गाडीच्या टपावर मुसळधार वाजणारा पाऊस, मिनिटाला वाढणारं गाडीची चाकं गिळणारं पाणी, त्यात २६ जुलैचा दिवस असल्याने धास्ती, भीती आणि १४ वर्षांपूर्वीच्या कटू आठवणी, असं सर्व भयावह चित्र गाडीत अडकलेल्या प्रवाशांचं होतं. गाडी थांबल्यावर संपूर्ण रात्र प्रवासी अन्न पाण्याविना मदतीच्या प्रतीक्षेत होते. गाडीतील पाणीही संपल्याने पावसाच्या पाण्यावरच त्यांनी आपली तहान भागवली.

शुक्रवारी रात्रीपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसाने बदलापूर वांगणी परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. उल्हासनदीला पूर आल्याने रेल्वे मार्ग पाण्याखाली गेला. महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्रीपासूनच चामटोली गावाजवळ अडकून पडली हेाती. मध्यरात्रीनंतर पुराचे पाणी डब्ब्यात शिरल्यानंतर प्रवाशांना धडकी भरली होती. मात्र, प्रवाशांनी एकमेकांना धीर दिला. रेल्वेतील पाणीही संपले होते. त्यामुळे प्रवाशांनी पावसाचे पाणी बाटलीत जमा करून तहान भागवली.

मध्यरात्री तीनच्या सुमारास गाडी मधोमध अडकून पडली होती आणि आजुबाजूला संपूर्ण पाण्याने वेढले होते. मात्र, प्रवाशांनी कशी बशी रात्र काढली. स्थानिक गावकर्‍यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना धीर दिला. मात्र, सकाळी या घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. मदत व बचाव कार्याला सुरुवात झाली. एनडीआरएफच्या 4 टीम दुपारी बाराच्या सुमारास घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू केले. 8 बोटींच्या सहाय्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. नौदलाच्या 4 टीम, भारतीय हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर्स, लष्कराच्या दोन तुकड्या त्या ठिकाणी दाखल झाल्या. हेलिकॉप्टर्सच्या मदतीने पूरस्थितीचीही पाहणी करण्यात आली. अखेर दुपारी अडीचच्या दरम्यान सर्व प्रवाशांना रेल्वेबाहेर काढण्यात आले.

चिमुकलेही अन्न पाण्यावाचून भूकेले
शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते शनिवारी दुपारपर्यंत प्रवासी अडकून पडल्याने त्यांच्याकडील अन्न खाद्यपदार्थ व पाणी हे संपलं होतं. रेल्वेच्या डब्यातील पाणीही संपले होते. डब्ब्यातील लहान मुलांनी पावसाचे पाणी बाटलीत भरून तहान भागवली. एकमेकांकडून अन्नपाणी गोळा करून चिमुकल्यांचे पोट भरले जात होते. अखेरीस हे अन्नही संपले, रेल्वेच्या पॅन्ट्रीमधील जेवणही संपल्याने प्रवासी भुकेपुढे हतबल होते. दुसरीकडे वाढत जाणारे पाणी भीती दाखवत होते.

गावकरी देवासारखे धावले
मध्यरात्रीपासून डब्यात अडकून पडल्यानंतर एकही शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधींना मदतीला आली नाही. रेल्वे प्रशासनाकडून कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, स्थानिक गावकरी हे देवासारखे धावून आले. त्यानंतर एनडीआरएफची टीम आल्यानंतर त्यांनी सुटका केली त्याबद्दल प्रवाशांनी गावकर्‍यांचे आभार मानले.

बदलापूरला पाण्याचा विळखा

शुक्रवारी सकाळपासून धोधो कोसळणार्‍या पावसामुळे बदलापुरातील अनेक भागात पाणी साचले असून काही भागात पाणी पहिल्या मजल्याच्या जवळपास पोहचल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे 26 जुलैच्या आठवणी ताज्या झाल्याने अनेकजण धास्तावले होते. परंतु शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने संध्याकाळी पाण्याची पातळी कमी झाली.

शुक्रवारी (ता. 26) सकाळपासून बदलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रात्रीपासून रस्त्यांवर तसेच सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. रात्री उशिरा पावसाचा जोर वाढत गेला. त्यामुळे बदलापूर पश्चिम भागातील बॅरेज रोड, हेंद्रेपाडा, रमेशवाडी, मांजर्ली आदी भागात पाण्याची पातळी वाढू लागली. उल्हास नदीने धोक्याची पातळी गाठल्याने नदी पात्रातील पाणी लगतच्या सखल भागात शिरले.

त्यामुळे बदलापूर गाव, एरंजाड व सोनीवली आदी भागातील नागरिकांना बदलापूर स्टेशनच्या दिशेने येण्याचा मार्ग बंद झाला होता. तर रमेशवाडी हेंद्रेपाडा आदी भागात तळमजल्यावरील घरे जवळपास पाण्यात होती. कात्रप व शिरगाव भागातही काही ठिकाणी घरात पाणी शिरले होते. त्यात पावसाचा जोर कायम होता. पावसाचा जोर पाहता सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक भागात वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे नागरिक धास्तावले होते. पावसाचा जोर आणखी वाढल्यास पुन्हा 26 जुलैची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत होते. मात्र सुदैवाने शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला. त्यामुळे दुपारनंतर हळूहळू पाण्याची पातळी कमी होत गेली.

लोकलसेवा कोलमडली
मुसळधार पावसामुळे बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून रेल्वेसेवाही ठप्प होती. शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर संध्याकाळी 5.30 वा बदलापूरहून कल्याणच्या दिशेने पहिली लोकल रवाना झाली.

रविवारी पाणीपुरवठा बंद
मुसळधार पावसामुळे बदलापूर तसेच अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी व काही भागात पाणीपुरवठा करणार्‍या बॅरेज बंधार्‍यात पाण्याची पातळी वाढली असल्याने रविवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भातसा, काळू नदीला पूर

वासिंदच्या 14 गावांचा संपर्क तुटला

शहापूर तालुक्यातील भातसा व काळु या दोन्ही नद्यांना शनिवारी पूर आला. त्यामुळे सापगाव पूल व गोठेघर जवळील टाटा पावर हाऊसजवळील पूल पाण्याखाली गेल्याने शहापूर किन्हवली या मार्गावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळे एसटी बसेस, खासगी वाहने अडकून पडली.

तहसीलदार कार्यालयातून नदी किनार्‍यावरील गावांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. शहापुरातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच वीज पुरवठा खंडीत झाल्याने गावे अंधारली आहेत. वाशिंद पूर्व पश्चिमेला जोडणारा पूल-रस्ता पाण्याखाली गेल्याने पुर्वेकडील 14 गाव पाड्यांचा संपर्क तुटला. काळूनदीला पूर आल्याने किनार्‍याचे अल्याणी गाव पाण्यात बुडाले आहे. येथील शेकडो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली गेली.

आरोग्य केंद्राच्या छतावर गेल्याने बचावले ४ कर्मचारी

मुरबाड तालुक्यातील किशोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील चार कर्मचार्‍यांना शुक्रवारची रात्र वैर्‍याची ठरली होती. मुरबाडी नदीच्या पात्राचे पाणी वाढले असल्याने किशोर प्राथामिक आरोग्य केंद्रात रात्री पाणी शिरले. यातील चार कर्मचारी आपला जीव वाचविण्यासाठी आरोग्य केंद्राच्या छतावर चढल्याने त्यांचा जीव वाचला. रात्रभर आरोग्य कर्मचारी छतावर अडकून पडल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यानंतर त्यांनी सकाळी आरोग्य केंद्राकडे धाव घेत पाणी ओसरल्यानंतर सुरक्षितपणे या कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात यश मिळवले आरोग्य केंद्रातून सुरक्षित बाहेर पडल्यानंतर या भेदरलेल्या कर्मचार्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला .

किशोर प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुरबाडी नदीलगत आहे. जोरदार पावसात नदीचे पाणी दवाखान्याची संरक्षण भिंत ओलांडून दवाखान्यात शिरले. रात्रपाळीसाठी असलेल्या बाळू वाघ, आरोग्य सहायक कविता निमसे, एएनएम सुनीता सातव, परिचर काथोड सातव हे कर्मचारी आरोग्य केंद्रात अडकून पडले. पावसामुळे पाणीपातळी वाढल्यावर कर्मचारी दवाखान्याच्या छतावर जाऊन बसले. रात्रभर पावसात हे कर्मचारी छतावर होते. सकाळी किशोर परिसरातील नागरिकांना व तालुका आरोग्य अधिकारी बनसोडे यांना ही घटना समजली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल व स्थानिक लोकांच्या मदतीने आरोग्य केंद्रात अडकलेल्या कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

बुडत्याला वाचवणारा तरुण बेपत्ता

भिवंडी : मित्रांसोबत पोहायला गेलेला तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चिंबीपाडा येथील वारणा नदीच्या बंधार्‍यावर घडली आहे. कैलास तुकाराम भगत ( 32 रा.नागांव ) असे तरुणाचे नाव आहे.
कैलास हे माजी शिवसेना नगरसेवक रोहिदास भगत यांचे बंधू आहेत. मित्रांसोबत जेवण झाल्यावर सात ते आठ मित्र दुपारनंतर पोहण्यासाठी बंधार्‍याच्या पाण्यात उतरले. मात्र दिवसभर पाऊस सुरू असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढून बंधार्‍यावरून पाण्याचा जोराने विसर्ग सुरू होता. यावेळी महेश भगत हे खोल पाण्यात वाहून जात असताना त्यांना बेपत्ता झालेल्या कैलास व त्यांच्या मित्रांनी सुखरूपपणे बाहेर काढले. मात्र कैलास हा पाण्याच्या वेगवान भोवर्‍यात सापडल्याने ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. त्याचा तालुका पोलीस तसेच स्थानिक नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरू आहे.

उल्हासनगरात माणुसकीचा ओलावा

उल्हासनगरात माणुसकीचा ओलावा
उल्हासनगरातही पूरस्थिती निर्माण झाली. नागरिक, स्वयंसेवी संघटनांनी मदतकार्य सुरू केले. वालधुनी, उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे नदीपात्राजवळील भरतनगर, शांतीनगर, मीनाताई ठाकरे नगर, 17 सेक्शन, सुभाषनगर , सम्राट अशोक नगर, संजय गांधीनगर, रेणुका सोसायटी, नगरपंचशील नगर, रेणुका सोसायटी वरप, हिराघाट, करोतीया नगर, शहाड, कांबा, वरप आदी परिसरात घरे दुकानात पावसाचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले.

टाऊन हॉल येथे पाणी घुसलेल्या कुटुंबांची राहण्याची तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था केली आहे. कुमार आयलानी, आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी, ओमी कलानी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी सेंच्युरी कॉलनी, ओम साई नगर , म्हारळ, कांबा , वरप , सम्राट अशोक नगर आदी परिसरात पूरग्रस्तांना मदत करून खाद्य सामग्री पुरवली.

त्या सात प्रवाशांना ग्रामस्थांनी वाचवले

महालक्ष्मी एक्सप्रेसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्याला सुरुवात होण्यापूर्वी या गाडीतील सुमित सायेकर, मेहबूब तांबोळी, आकाश दुबळे, गणेश पांडव, विशाल पांडव, संदीप शिंदे व सचिन रोकडे हे सात प्रवासी गाडीमधून उतरले आणि रेल्वे रुळांवरून चालत निघाले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पुढे पाणी खूप खोल असल्याने ते अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांना हे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी आणि एका स्वयंसेवी संस्थच्या कार्यकर्त्यांनी दोरीच्या साहाय्याने या सात जणांना सुखरूप पाण्याबाहेर काढले.

गाडी अंबरनाथलाच थांबवायला हवी होती
रेल्वे प्रशासनाला पाण्याच्या पातळीची कल्पना होती तर त्यांनी गाडी अंबरनाथ किंवा बदलापूर स्थानकावरच थांबवायला हवी होती. अंबरनाथ स्थानकांवर गाडी आधीच सुमारे दोन तास थांबवलीच होती. ती स्थानकावरच थांबवली असती तर हा त्रास झाला नसता. रेल्वेच्या गलथानपणाचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आलेल्या पहिल्याच तुकडीतून बाहेर आलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली.

वृद्ध महिलेला वाचवले
शोभा पवार या 61 वर्षाच्या महिलेला दम्याचा त्रास होत होता. त्यांना बोटीतून बाहेर आणले खरे मात्र चामटोली चा डोंगर चढून मुख्य रस्त्यावर येईपर्यंत त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. चामटोली येथील ग्रामस्थांनी प्रवाशांसाठी तसेच मदत कार्य करणार्‍यांसाठी चहा व बिस्किटांची विनामूल्य सुविधा उपलब्ध करून दिली होती. महालक्ष्मी एक्सप्रेस मधून बोटीने बाहेर आणताना प्रवाशांना गाडी पासून चामटोली डोंगराच्या पायथ्याशी आणण्यापेक्षा कर्जत महामार्गालगत जेथे पाणी साचले होते तेथे बोटीने नेले असते तर प्रवाशांच्या सोयीचे झाले असते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

अडकलेल्या शेकडो जणांची अखेर सुटका

मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली आणि आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेकडो घरांमध्ये पाणी गेल्याने अनेक लोक अडकून पडली होते. कांबा वरप येथील पेट्रोल पंपाच्या छतावर शंभरजण अडकून पडले होते. एनडीआरएफच्या टीमने त्यांची सुटका केली.

उल्हासनदीला पूर आल्याने कल्याण येथील म्हारळ गावातील घरे पाण्याखाली गेली होते. इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्याने नागरिक भयभीत झाले होते. त्यामुळे स्थानिक रहिवासी आपला जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या छतावर चढले होते.

हेलिकॉप्टरची मदत
कांबा-वरप येथील पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्याने तब्बल शंभरजण अडकून पडले होते. पेट्रोल पंपावरील गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत. तसेच त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्येही काहीजण अडकून पडले आहेत. रस्त्यात पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. त्यामुळे अडकून पडलेल्या रहिवाशांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली.

भिंत कोसळल्याने गाड्यांचे नुकसान
डोंबिवली पूर्वेतील पंचायत बावडी, सारस्वत कॉलनी याठिकाणी भिंत कोसळल्याने पाच-सहा गाड्यांचे नुकसान झाले.
कल्याणजवळील कांबा गावात घराच्या पत्र्यापर्यंत पाणी पोहचले होते. त्यामुळे अनेक रहिवाशी पत्र्यावर जाऊन चढले होते. अशा अडकलेल्या 38 लोकांची सुटका करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या पथकाने बचावकार्य राबवले. त्यामध्ये एका गरोदर महिलेचाही समावेश आहे.

First Published on: July 28, 2019 5:01 AM
Exit mobile version