सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणात

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणात

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणाकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. महापालिका क्षेत्रात निर्बंध असल्याने सध्या मोठ्या संख्येने पर्यटन कोकणात दाखल होत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, सातारासह इतर भागांमधून पर्यटक कोकणात येत आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वाढती संख्या पाहता सध्या याठिकाणची हॉटेल्स, रेस्टॉरंटसह होम स्टे देखील फुल्ल झाल्याचं दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी कोणतेही कडक निर्बंध नसले तरी पर्यटकांनी कोरोनाकाळातील नियम पाळावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

एक्स्प्रेस-वेवर वाहतूक कोंडी

नाताळची सुट्टी आणि त्याला जोडूनच शनिवार आणि रविवारची सलग सुट्टी आल्याने मोठ्या संख्येने लोक पर्यटन आणि गावी खासगी वाहनांनी निघाले. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटातील अमृतांजन पूल ते पनवेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नाताळ आणि त्यानंतर शनिवार, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्याने लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्याकडे जाणार्‍या मार्गिकेवर वाहनांची वर्दळ वाढली होती. खंडाळा घाटातील अमृतांजन पूल ते पनवेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पुणे-बंगळुरू महामार्गावर गर्दी

पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसत होते. ख्रिसमस आणि महिना अखेरीच्या अनुषंगाने मिळालेल्या सलग तीन सुट्ट्यांचा लाभ घेण्याकरता पुणेकर हवापालट करण्यासाठी शहराच्या बाहेर पडला होता. मात्र, पुणे-बंगळुरू महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची गर्दी झाल्याने फिरायला निघालेले पुणेकर कोंडीत अडकले आहेत. मुंबई-पुण्याचे पर्यटक कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर, कोकण, गोव्याला महामार्गावरुन जातात, म्हणून पुणे-बंगळुरू महामार्गावरील कात्रज घाट ते खेडशिवापूर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

मालवणातही गर्दी

मालवणात कोरोनाचा प्रादुर्भावही इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. मालवण शहर कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मास्क व सोशल डिस्टन्स नियमांचे पालन पालिका व पोलीस प्रशासन कठोरपणे करत आहेत. याचा परिणाम म्हणून मालवणात कोरोनाचा शिरकाव कमी आहे. यामुळे पर्यटकांची पसंती मालवण ठरत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हाऊसफुल्ल ही स्थिती नसली तरी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यात वृद्ध व लहान मुलांचा सहभागही आहे. किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, पॅरासेलिंगचा आनंद पर्यटक मोठ्या प्रमाणात लुटत आहेत. त्याबरोबर मालवणी जेवणावर पर्यटक ताव मारत आहेत. एकूणच पर्यटकांनी ख्रिसमस विकेंडला मालवणला पसंती दिली आहे. मालवण शहर, बंदर जेटी, चिवला बीच यासह दांडी, वायरी, तारकर्ली, देवबाग याठिकाणी सागरी पर्यटन व समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक लुटत आहेत. तसेच कृषी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या घुमडे येथेही निसर्गाच्या सानिध्यात पर्यटन सफरीला पर्यटक प्राधान्य देत आहेत.

First Published on: December 26, 2020 6:39 AM
Exit mobile version