आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर!

आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर!

स्पर्धेतील विजयी खेळाडू

महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांनी हैद्राबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री राजे अंबरीश अत्राम, विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तेलंगणा आदिवासी कल्याण निवासी शैक्षणिक संस्थेच्या (टीटीडब्ल्यूआरआयएस) वतीने, हैदराबादच्या गच्चीबावली स्टेडियमध्ये १४ जानेवारी ते १६ जानेवारी दरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील १ हजार ८०० आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी काहींनी अतिशय उत्तम कामगिरी करुन राज्याला २९ पदकांची कमाई करून दिली. हॉकी, कुस्ती, व्हॉलीबॉल, हँडबॉल, फुटबॉल, कबड्डी, खोखो आणि ॲथलेटिक्स अशा खेळांचा समावेश या स्पर्धेत होता.

एकूण १२ खेळ प्रकारांमध्ये महाराष्ट्रातील २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात त्यांनी ६ सुवर्ण, १३ रौप्य आणि १० कांस्य पदके मिळवली. हॉकी या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटाने प्रत्येकी एक-एक सुवर्ण पदक आणि कुस्तीमध्ये ६१ किलो गट, ४३ किलो गट, ४० किलो गट आणि ३८ किलो गट वजनी गटामध्ये प्रत्येकी एक, अशी एकूण ४ सुवर्ण पदके पटकवली आहेत. हे यश आहे, दुर्गम भागात खडतर परिस्थितीत विविध आव्हानांना सामोरे जात आपल्या खेळाप्रती श्रद्धा असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे हाती काही साधन नाही. बड्या खेळ संस्थांचा पाठिंबा नाही, अमाप शुल्क भरून मिळणारे खेळाचे तांत्रिक प्रशिक्षण नाही. अशा परिस्थितीत केवळ जिद्द आणि मेहनत यातील सातत्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना हे यश मिळाले आहे.

First Published on: January 22, 2019 7:37 PM
Exit mobile version