वडिलांना लाडक्या बारा लेकींनी दिला खांदा, प्रसंग पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले

वडिलांना लाडक्या बारा लेकींनी दिला खांदा, प्रसंग पाहून गावकऱ्यांचे डोळे पाणावले

खंडणीप्रकरणी नील सोमय्या यांची पोलिसांकडून चौकशी

लॉकडाऊनच्या काळात आपल्याला माणुसकीचं दर्शन झालं. अनेकांनी आपल्या रक्ताचं नातं नसलेल्या मृत व्यक्तींना काही कारणास्तव खांदा दिलेलं पाहिलं आहे. आपल्याकडे मृत व्यक्तीचं अंत्यसंस्कार हे पुरुषचं करत असतात. पण हीच पुरुषप्रधान संस्कृती मोडून लाडक्या लेकींनी आपल्या वडिलांना खांदा दिल्याची घटना घडली आहे. बारा लेकींनी वडिलांना खांदा देऊन अक्षरशः गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. मानोरा तालुक्यातील शेंदुर्जना येथे शुक्रवारी हजारो गावकऱ्यांनी हा दुःखद प्रसंग अनुभवला. बारा लेकी वडिलांना खांदा देताना पाहून संपूर्ण गाव गहिवरले होते. यावेळी मुलगा नसल्याची कोणतीही उणीव या बारा लेकींनी भासू दिली नाही.

गुरुवारी सखाराम गणपतराव काळे यांच्या वयाच्या ९२ वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. मानोरा तालुक्यातील शेंदुर्जना येथे १४ सप्टेंबर १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला होता. बालपणापासूनच त्यांना सामाजिक कार्यात भाग घेण्याची खूप आवड होती. त्यांनी चुलत भाऊ नामदेवराव काळे यांच्यासोबत शेंदुर्जना या ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया रोवला. ते पश्चिम विदर्भातील नामांकित शिक्षण संस्था अप्पास्वामी शिक्षण संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. या संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असून त्यांनी या संस्थेचे नाव लोकप्रिय केलं. खेड्यातील मुलांना उच्च शिक्षण गावामध्येच मिळावं यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली.

विविध सामाजिक उपक्रमात भाग घेणारे सखाराम राणे गावात दानशूर म्हणून ओळखले जात होते. पण गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळाने सखाराम काळे आजारी होते. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सखाराम काळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी बारा मुलींच्या खांद्यावर आली आणि त्यांनी ती पार पाडली. पुरुष ज्याप्रमाणे अंत्यसंस्कार करतात त्याचप्रमाणे या लाडक्या लेकींनी वडिलांचे अंत्यसंस्कार केले. हाच प्रसंग पाहून गावकऱ्यांच्या डोळे पाणावले.


हेही वाचा – कोरोनाचा धसका! वडिलांना खांदा देण्यास मुलांचा नकार, आरोग्य कर्मचारी-पोलिसांनी दिला खांदा


 

First Published on: January 31, 2021 1:00 PM
Exit mobile version