गँगस्टर विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात बेड्या

गँगस्टर विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात बेड्या

कानपूरमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणासह ६० पेक्षा अधिक गुन्हे असलेला कुख्यात गुंड विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी कुख्यात गुंड विकास दुबेचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आल्यानंतर आता विकास दुबेच्या साथीदारांना ठाण्यात बेड्या ठोकल्या. अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा ड्रायव्हर सोनू तिवारी या दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी ही धडक कारवाई केली आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर विकास दुबेचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला. या घटनेनंतर त्याचे साथीदार फरार झाले होते. दुबेच्या दोन साथीदार ठाण्यात लपल्याची माहिती दया नायक यांना मिळाली होती. त्यानंतर या दोघांना ठाण्यातून अटक करण्यात आली.

कोण होता विकास दुबे?

विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात जवळपास ६० च्या आसपास गुन्हे दाखल होते. यामध्ये हत्या आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वी पोलीस विकास दुबेला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी विकास दुबेच्या गुंडांकडून पोलिसांवर बेछुट गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलिसांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गुंड विकास दुबेला गुरुवारी अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी जेव्हा विकास दुबेला घेऊन पोलीस जात होते तेव्हा विकास दुबेने बंदूक घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो चकमकीत मारला गेला.


हेही वाचा – पुणे लॉकडाऊनचा निर्णय अजितदादांनी परस्पर घेतला; गिरीश बापट यांचा आरोप


 

First Published on: July 11, 2020 4:34 PM
Exit mobile version