मुक्त विद्यापीठाच्या पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना उद्या मिळणार पदवी

मुक्त विद्यापीठाच्या पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना उद्या मिळणार पदवी

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारंभ मंगळवार (दि.१७) रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठात होत आहे. राज्यातील पाऊणेदोन लाख विद्यार्थ्यांना यावेळी प्रदवी प्रदान केली जाणार आहे.
पदवी प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी असून, त्यांची या सोहळ्याला ऑनलाईन उपस्थिती लाभणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहतील. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा एएफसी इंडियाचे अध्यक्ष प्रा. चारुदत्त मायी स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करणार आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे यावर्षी एकूण एक लाख ७६ हजार ११३ विद्यार्थी पदवी प्राप्त करत आहे. नोंदणी केलेले स्नातक या सोहळ्याला उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि एक हजार ८७४ अभ्यासकेंद्रे यांच्यामार्फत राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य केले जाते. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी पाच लाख ५० हजाराहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट आहेत. पीएच. डी., एम. फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या जवळपास १३८ शिक्षणक्रम एक लाख ७६ हजार ११३ विद्यार्थ्यांना यंदा पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनातर्फे तयारी करण्यात येत आहे. दीक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने व वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे व परीक्षा नियंत्रक भटू प्रसाद पाटील यांनी केले आहे.

विद्यार्थ्यासाठी बस व्यवस्था

दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार्‍या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाकडे येण्यासाठी नाशिक शहरातून सिटी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नाशिकरोड स्थानकातून सकाळी ०९ वाजता बस सुटेल. पंचवटी-निमाणी बस स्थानकातून ९.१५ वाजता, मध्यवर्ती मेळा बस स्थानकातून (सी. बी.एस.) ९.३० तर अशोकस्तंभापासून ९.४५ वाजता सिटी बस निघणार आहेत.

First Published on: May 16, 2022 12:22 PM
Exit mobile version