पालघर भूकंपाप्रकरणी दोन संस्था देणार अहवाल

पालघर भूकंपाप्रकरणी दोन संस्था देणार अहवाल

पालघर भूकंपाप्रकरणी दोन संस्था देणार अहवाल

गेल्या दोन वर्षांपासून पालघर जिल्ह्यात भूकपांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयआयटी मुंबई आणि हैदराबाद येथील नॅशनल जिओग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूटचा अहवाल मागविण्यात आल्याची माहिती भूकंप पुनवर्सन मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. तर याबरोबरच येथील भूकंप प्रभावित परिसरामधील नागरिकांना भूकंपाच्या धक्क्याच्या अनुषंगाने जनजागृती व आपत्कालीन कार्यवाहीचे प्रशिक्षण आणि सर्वतोपरी मदत देण्यात येत असल्याचे देखील देसाई यांनी जाहीर केले.

सुभाष देसाई पालघरला भेट देणार

पालघर येथे वाढत असलेल्या भूकंपाच्या घटना लक्षात घेता याप्रकरणी विधान परिषद सदस्य आनंद ठाकूर यांनी बुधवारी लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी बोलताना सुभाष देसाई यांनी वरील माहिती दिली. दरम्यान, याप्रकरणी हिवाळी अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर सुभाष देसाई पालघरला भेट देणार असून यावेळी सर्व त्या संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांना बोलविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

आवश्यक त्या उपाययोजना राबवणार

यावेळी बोलताना सुभाष देसाई म्हणाले की, “पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, तसेच स्थानिक जनतेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या भितीचे वातावरण निर्माण होवू नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम शालेय स्तरावरून तसेच गावागावातील नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेला आहे. यापुढेही राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी एन. डी. आर. एफ. (NDRF), सिव्हिल डिफेन्स (Civil Defence) मार्फत वेळोवेळी प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे.”

चर्चेत रविंद्र फाटकांचा सहभाग

भूकंपाबाबतच्या अभ्यासासाठी नॅशनल जिऑग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, हैद्राबाद यांचे पथक, डहाणू तालुक्यात २० जानेवारी ते ११ नोव्हेंबर २०१९ कार्यरत होते. तसेच भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबई (IIT MUMBAI) येथील प्रा.रवि सिन्हा यांच्या समितीने शिफारस केल्यानुसार भुकंपग्रस्त भागातील भातसा व धामणी धरणावर एक्यलेरोमिटर बसविण्याची कार्यवाही सुरु असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तर या चर्चेत सदस्य रविंद्र फाटक यांनी सहभाग घेतला.

First Published on: December 18, 2019 5:40 PM
Exit mobile version