नांदगावी काळविटाची शिकार; मांस हस्तगत, दोघे गजाआड

नांदगावी काळविटाची शिकार; मांस हस्तगत, दोघे गजाआड

प्रातिनिधीक फोटो

नांदगाव – गावठी बंदुकीने गोळी झाडून काळविटाची शिकार केल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील जामधरी येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचत दोन संशयित आरोपींना पकडले. मुद्स्सर अहमद आणि जाहिद अहमद (दोघे रा. मालेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी बंदूक, ५ जिवंत काडतुसे, काळविटाचे मांस व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना १५ दिवसांची वनविभाग कोठडी देण्यात आल्याची माहिती वनविभागाचे निरीक्षक दत्तात्रय बोरसे यांनी दिली.

वनविभागाचे शेकडो हेक्टर वनजंगल असून त्यात हरीण, काळवीट, ससे, मोर यांसह इतर अनेक वन्य प्राणी आहेत. जामधरी भागात शुक्रवारी (दि.९) रात्री दोन शिकार्‍यांनी गावठी बंदुकीतून गोळी झाडून एका काळविटाची शिकार केली. काळविटाची शिकार करण्यात आल्याची माहिती मिळताच वनविभागाचे वनक्षेत्रात अधिकारी दत्तात्रय बोरसे, वनपाल टी. ई. भुजबळ, एम. एम. राठोड, डी. एफ. वडगे, ए. ई. सोनवणे, बी. जे. सूर्यवंशी, एम. बी. पाटील, दौड, राठोड, शिरसाठ आदींनी घटनास्थळी धाव घेत २ आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक गावठी बंदूक, पाच जिवंत काडतुसे, काळविटाचे मांस आणि इतर साहित्य जप्त केले. दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता १५ दिवसांंची कोठडी सुनावण्यात आली.

First Published on: October 11, 2020 10:00 PM
Exit mobile version