चोरलेला धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येतो, मग बघू.., ठाकरेंचं थेट शिंदेंना आव्हान

चोरलेला धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येतो, मग बघू.., ठाकरेंचं थेट शिंदेंना आव्हान

कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु आहे. या पोटनिवडणुकीसाठी आज आयोजित प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला.तुम्ही आमचा धनुष्यबाण चोरला आहे, पण आमच्याकडे मशाल आहे. तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन येतो, मग बघू, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलं आहे.

महाविकास आघाडी म्हणून एकत्र आल्यानंतर आपलं नाव आणि चिन्ह चोरलं. आपल्यात फूट पाडण्यात आली. शिवसेना मूळासकट संपवायला निघाले. हे राजकारण आणि लोकशाही मी मानायला तयार नाही. सहानभुती मात्र आता भाजपला दाखवण्याची परिस्थिती राहिलेली नाही. तुमचा वापर करून जर भाजप आपली पाशवी पकड घट्ट करू पाहत असेल तर ती पकड ढिली करावीच लागेल आणि ही निवडणूक आम्हाला जिंकावीच लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आमच्याबद्दल जर तुमच्या मनात सहानुभूती नसेल तर आमच्याही मनात नाही हे आता तुम्हाला दाखवण्याची वेळ आली आहे. कारण प्रत्येक वेळी आपल्याला गृहीत धरून राजकारण केलं जातं. पिंपरी-चिंचवडमधील घोटाळे बाहेर काढा. अनधिकृत बांधकामांची चौकशी करा. आश्वासनं देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

टिळकांच्या कुटुंबीयांना कोणालाही उमेदवारी न देता, त्यांची उमेदवारी बदलण्यात आली. सगळ्यात एक क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीश बापट यांना ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घालून त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलावलं. ही लोकशाही आहे का?, अशा पद्धतीने लोकांचा वापर करायचा आणि त्यांना फेकून द्यायचं. अशा पक्षाला आपण मतदान करायचं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा : टिळकांच्या घराण्याला उमेदवारी नाही, गिरीश बापट आजारी असतानाही..; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


 

First Published on: February 23, 2023 10:02 PM
Exit mobile version