उद्धव ठाकरेंनी सेनेच्या मंत्र्यांना मंत्रालयात येण्याची बंदी करावी

उद्धव ठाकरेंनी सेनेच्या मंत्र्यांना मंत्रालयात येण्याची बंदी करावी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणारमध्ये जावून नाणार प्रकल्प रद्द झाल्याचे जाहीर करतात आणि दुसरीकडे भाजपचे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान नाणार प्रकल्पाचा करार करतात, ही जनतेची दिशाभूल आहे. भाजप मंत्र्यांना मातोश्रीची पायरी चढू दिली जाणार नाही, असे सांगण्यापेक्षा हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू नका असा आदेश द्यावा, असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले.

शिवसेना नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा करते आणि दुसरीकडे भाजपचे मंत्री नाणार प्रकल्पाचा करार करते या भूमिकेवर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणारमध्ये जावून नाणार प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केली होती. परंतु, असे असतानाही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ३ लाख कोटींच्या नाणार प्रकल्प करारावर सही केली. त्यानंतर शिवसेनेने भाजपमंत्र्यांना मातोश्रीची दारे बंद असल्याचे स्पष्ट केले.

नाणार प्रकल्पाबाबत जनतेची दिशाभूल

नाणार रद्द झाला असताना प्रधान यांनी करार केला कसा असा सवाल करतानाच नाणार प्रकल्पाबाबत जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. मातोश्रीच्या पायऱ्या भाजप मंत्र्यांनी कधी चढायच्या हे उध्दव ठाकरे यांनी ठरवावे, परंतु आपल्या मंत्र्यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या कधी चढू नये याची घोषणा ते कधी करणार हे लवकरच जाहीर करावे अन्यथा त्यांनी पायऱ्यांचे नाटक बंद करावे, असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला.

निलंगेकरांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा

राज्यात मंत्र्यांच्या माध्यमातून गुंडाच्या टोळ्या काम करत असून मुख्यमंत्र्यांनी जंगलराज निर्माण केले आहे. संभाजी निलंगेकरांचा बॉडीगार्ड करणसिंह याला अटक झाल्यावर त्यांनी आपण त्याला ओळखत नाही, असे सांगितले. ते जनतेची दिशाभूल करत आहेत. करणसिंह याच्याकडे कार्बाईन कशी आली, ही कार्बाईन त्याच्याकडे आली कुठून, मंत्रीमहोदयांच्या बंगल्याबाहेर ही कार्बाईन घेवून त्याने फोटो काढले आहेत, त्यामुळे निलंगेकर यांची हकालपट्टी करा, असे मलिक म्हणाले.

First Published on: June 29, 2018 10:36 AM
Exit mobile version