…तर गद्दारांनी सांगावे भाजपाच्या तिकिटावर लढणार नाही, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

…तर गद्दारांनी सांगावे भाजपाच्या तिकिटावर लढणार नाही, उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला आव्हान

भाजपा आयात पक्ष आहे. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. आपल्या पक्षातले नेते संपले की बाहेरून चोरून घ्यायचे. म्हणूनच माझा या चाळीस रेड्यांना सवाल आहे की त्यांच्यामध्ये मर्दांगी शिल्लक असेल तर, त्यांनी जाहीर सांगावे की आम्ही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार नाही. त्यांना बाळासाहेबांचे नाव पाहिजे. चेहरा पाहिजे आणि मोदींचे आशिर्वाद पाहिजे. मग तुमची मेहनत कुठेय, असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी शिदे सरकार आणि भाजपावर निशाणा साधला. (Uddhav Thackeray Slams Maharashtra CM Eknath Shinde and BJP In Buldhana)

चिखली इथल्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकारवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “मी बुलढाण्यामध्ये आल्यानंतर मला काही जुने चेहरे दिसत नाही आहेत. पण जुने होते ते फसवे होते, गद्दार निघाले. त्यांना वाटलं की हे बुलढाणा म्हणजे त्यांची मालमत्ता आहे. परंतु, खरच तुमच्या उत्साहाकडे बघितल्यानंतर असेच वाटते की या पटलेल्या मशाली अन्याय जाळायला निघाल्या आहेत. आपले सरकार चांगले चालले होते. पण हे सरकार पाडलं गेलं. पण यांची सरकार पाडायची पद्धत म्हणजे अनेकांना गुवाहटीला घेऊन गेले. नितीन देशमुखांनाही घेऊन गेले होते. पण नितीन देशमुख शिवसेना पक्षासी असलेल्या निष्ठेमुळे परत आले. आज तिकडेला काय झाडी…काय डोंगर…सगळं ओकेमध्ये गेलेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

“आपला शेतकरी मेळावा आहे. आज त्यांना आशिर्वाद घेण्यासाठी तिकडे जावे लागले. पण मी तुमचे आशिर्वाद घेतोय. मी या जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच बुलढाण्यामध्ये माझ्या माता-भगिनींचे, बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे आशिर्वाद घ्यायला आलोय. मी पुन्हा उभा आहे आणि मी जिंकणार म्हणजे जिंकणारच, कारण माझा आत्मविश्वास तुम्ही आहात. पण काही जणांना ते घेऊन गेले”, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

पण ताई हुशार होत्या, त्यांनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली

“पलिकडे आपल्या ताई आहेत, आजही आपल्या त्या ताईच आहेत. आपण त्यांना अनेकदा खासदार केले. इथल्याही आमदारांना आणि खासदारांना तुम्ही राब-राब राबून आमदार-खासदार केलं. पण या ताईंना धमक्या देण्यात आल्या. मुंबईवरून खास दलाल याठिकाणी बोलवले जात होते. त्यांच्यावरचे सगळे आरोप वाचले गेले. त्यानंतर त्यांच्या आजूबाजूच्यांना अटक झाली. पण ताई हुशार होत्या, त्यांनी थेट पंतप्रधानांना राखी बांधली. पंतप्रधानांना राखी बांधल्याचा फोटो छापला. त्यानंतर या ईडी-सीबीआयची हिंमत नाही, त्यांच्यावर छापेमारी करायची”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नाव न घेतला शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या निशाणा साधला.

हा पक्ष आहे का चोरबाजार

आपण गेली २५हून अधिक वर्षे भाजपासोबत युतीमध्ये होतो. पण हा भाजपा पक्ष आयाच पक्ष झाला आहे. विचार संपले. नेते संपले. भाकड पक्ष झालेला आहे. काश्मीरपासून कन्याकूमारीपर्यंत यादी काढा मग तुम्हाला समजेल की यांच्या पक्षामध्ये आयात केलेले किती लोक आहेत. स्वत: चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, आम्ही मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच हा आयात पक्ष आहे. हा पक्ष आहे का चोरबाजार आहे. आपल्या पक्षातले नेते संपले की बाहेरून चोरून घ्यायचे. म्हणूनच माझा या चाळीस रेड्यांना सवाल आहे की त्यांच्यामध्ये मर्दांगी शिल्लक असेल तर, त्यांनी जाहीर सांगावे की आम्ही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार नाही. त्यांना बाळासाहेबांचे नाव पाहिजे. चेहरा पाहिजे आणि मोदींचे आशिर्वाद पाहिजे. मग तुमची मेहनत कुठेय”, असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.


हेही वाचा – ‘ज्याला स्वत:चेच भविष्य माहीत नाही, ते आपले भविष्य ठरवणार’; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

First Published on: November 26, 2022 6:25 PM
Exit mobile version