अखेर तेजस ठाकरेंचा राजकारणात प्रवेश?, दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोमुळे चर्चांना उधाण

अखेर तेजस ठाकरेंचा राजकारणात प्रवेश?, दसरा मेळाव्याच्या बॅनरवरील फोटोमुळे चर्चांना उधाण

दसऱ्या मेळाव्यावरून सध्या शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू आहे. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यासाठी अद्याप महापालिकेकडून दोघांनाही परवानगी देण्यात आलेली नाही. अशातच दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर तेजस ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात तेजस ठाकरेही राजकारणात सक्रीय होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. शिवाय तेजस ठाकरेंचा राजकारणात प्रवेश असेही बोलले जात आहे. (uddhav thackeray son tejas thackeray may entry into politics due to photo on banner of shiv sena dussehra melava dasara melava 2022)

शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेनेकडून ‘चलो शिवतीर्थ’ म्हणत दसरा मेळाव्यासंदर्भात बॅनरबाजी सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या बॅनर्सवरुन एकीकडे दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.

दादरमधल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार, हे अद्याप ठरलेले नसतानाही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर्स प्रदर्शित केले जात आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर या पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह तेजस ठाकरे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचा मुहुर्त साधत तेजस ठाकरेंची राजकारणात एन्ट्री होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने अद्यापही कोणालाच परवानगी दिलेली नाही. मात्र मेळावा घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट खूपच आक्रमक झालेला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. शिवाजी पार्क मैदानाभोवती सुरक्षिततेचे कडे उभारण्याची तयारी पोलिसांनी चालवली आहे. त्याचप्रमाणे, पोलिसांनी पालिकेच्या जी/ उत्तर विभाग कार्यलयासमोरही पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे.

याशिवाय, शिवसेनेने गोरेगाव, नेस्को येथे पर्याय म्हणून मेळाव्याची तयारी चालवल्याचे बोलले जात आहे. मात्र मुंबई महापालिका उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्याबाबत अनुकूल नसल्याचे आतापर्यंतच्या वस्तूपरिस्थितीवरून समोर येत आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी हालचाली झाल्यास सेनेला रोखण्यासाठी व कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी आतापासूनच शिवाजी पार्क परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.


हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास राहुल गांधींचा नकार?

First Published on: September 21, 2022 9:59 AM
Exit mobile version