मांडवली करायची असती तर १०० दिवस तुरुंगात राहिले नसते; ठाकरेंनी राऊतांची थोपटली पाठ

मांडवली करायची असती तर १०० दिवस तुरुंगात राहिले नसते; ठाकरेंनी राऊतांची थोपटली पाठ

मुंबई – संजय राऊतांनी तुरुंगाबाहेर येतचा शिंदे गटावर निशाणा साधला. बंडखोर आमदारांवर टीका केली. पण भाजपाविरोधात चकार शब्द काढला नाही. यावरून संजय राऊतांनी मांडवली केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळांत रंगली होती. मात्र, यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे. संजय राऊतांना मांडवली करायची असती तर ते १०० दिवस तुरुंगात राहिले नसते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

हेही वाचा – …राऊतांना पुन्हा गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, उद्धव ठाकरेंचा केंद्रीय यंत्रणांवर निशाणा

उद्धव ठाकरे म्हणाले की, संजय राऊतांचं तुरुंगातून परत येणं हा मोठा लढा आहे. तिकडे आपही याविरोधात लढते आहे. इतर विविध पक्षांतील नेत्यांनाही छळलं जातंय. हे सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर केवढी मोठी ताकद निर्माण होऊ शकते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सर्व विरोधकांना एकत्र येत केंद्र सरकारविरोधात लढा देण्याचं आवाहन केलं आहे.

केंद्रीय यंत्रणा पाळीव प्राणी

केंद्रीय यंत्रणा सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहेत. केंद्र सरकार न्यायदेवतासुद्धा अंकित करायला सुरुवात करतेय की काय असं वक्तव्य रिजूजू यांनी केलं आहे. न्यायालय हे सर्वसामान्यांच्या आशेचं किरण असतं. पण न्यायालयाही आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल तर सामान्य लोकांनी त्याला विरोध केला पाहिजे. केंद्रीय यंत्राणांचा दुरुपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले. आजही फोडले जातात. बेकायदेशीर अटक केली जाते. खोट्या केसेस केल्या जातात. न्यायालयाने काल दणका दिल्यानंतरही परत संजयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 संजय राऊत लांब पल्ल्याची तोफ

न्यायालयाने ईडीला चपराक दिली आहे. चपराक दिल्यानंतरही केंद्र सरकारला लाज वाटली असती तर एवढं झालंच नसतं. घाबरून पक्षातून पळून गेलेत त्यांच्यासाठी हा मोठा धडा आहे. न्यायदेवता निप्षक्ष निकाल देतेय, हा मोठा लढा आहे. तोफ तोफच असते. संजय राऊत लांब पल्ल्याची तोफ आहे, असं कौतुक उद्धव ठाकरे यांनी केलं.

संजय राऊतांच्या कुटुंबाचं कौतुक

संजय राऊत सुटल्याने आनंदाखेरीज दुसरी प्रतिक्रिया नाही. आनंदासोबतच संजयच्या धाडसाचं कौतुक आहे. संजय शिवसेनेचा नेता, खासदार आहे, सामनाचा कार्यकारी संपादक आहे. तसंच, माझा जीवलग मित्र आहे. मित्र तोच असतो जो संकटाच्या काळात न डगमगता लढत असतो. तसा हा माझा मित्र, संकटाच्या काळात फक्त सोबतच नाही तर लढतो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, संजय राऊत आणि त्याचं कुटुंबीय म्हणजे माझंच कुटुंब आहे. त्यामुळे त्यांना कसा धीर द्यायचा हा प्रश्न होता. पण संजयच्या आईचं, मुलीचं कौतुक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

First Published on: November 10, 2022 1:46 PM
Exit mobile version