शरयूनंतर उद्धव ठाकरे करणार चंद्रभागेतीरी आरती

शरयूनंतर उद्धव ठाकरे करणार चंद्रभागेतीरी आरती

फाईल फोटो

राम मंदिराच्या प्रश्नावरून शिवसेना आता आक्रमक झाली असून भाजपची कोंडी करण्याची एकही संधी शिवसेना सोडताना दिसत नाही. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा करत भाजपची कोंडी केली होती. शिवाय, मंदिर केव्हा बांधणार त्याची तारीख देखील सांगा असं आव्हान थेट भाजपला दिलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शरयू नदी किनारी महाआरती देखील केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे आता पंढरपुरातील चंद्रभागेतीरी देखील आरती करणार आहेत. २४ डिसेंबर रोजी शिवसेना पंढरपुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चंद्रभागेच्या किनारी आरती देखील करणार आहेत. पंढरपूर दौऱ्या दरम्यान उद्धव ठाकरे विठ्ठलाचे दर्शन घेऊन दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारनं विविध उपाय योजना कराव्यात, तसेच अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी सरकारला सुबुद्धी व्हावी असे साकडे देखील घालणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते मुंबई ते पंढरपूर दरम्यान धावणाऱ्या “विठाई” या नव्या एसटी सेवेचा शुभारंभ देखील होणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान हजारो वारकरी देखील सहभागी होणार आहेत. यासाठी मंत्र्यांवरची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे. शिवाय, शिवसेना भवनामध्ये त्याबद्दल आढावा देखील घेतला जात आहे.

वाचा – राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे

 

अयोध्या दौरा आणि सरकारवर टीका

२०१४ साली भाजपनं सत्तेवर आल्यानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर बांधणार असं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची आठवण शिवसेना भाजपला करून देत आहे. त्यामुळे भाजप समोरची राजकीय अडचण देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. २०१९मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा पाहता भाजपला राम मंदिराचा मुद्दा जड जाऊ शकतो. हिंदुत्व मतांवर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी देखील एक अटकळ आहे. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप देखील आक्रमक झालेली पाहायाला मिळत आहे. त्यामुळे भाजप पुढील पेच आणखी वाढताना दिसत आहे.

वाचा  – राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू – स्वामी

First Published on: December 16, 2018 5:39 PM
Exit mobile version