23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण, निमंत्रण पत्रिकेतून ठाकरेंचं नाव वगळलं

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा 23 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र, या निमंत्रण पत्रिकेत बाळासाहेबांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. ठाकरेंचं नाव निमंत्रण पत्रिकेतून पूर्णपणे वगळण्यात आलं आहे. त्यामुळे तैलचित्रावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी मुंबईतील विधानभवनात तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली. विधिमंडळ सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनाही आमंत्रित केले आहे.

या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच स्नेहांकीत म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची नावे आहेत. तसेच, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांचेही नावं आहे. मात्र, या पत्रिकेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख प्रोटोकॉल प्रमाणे टाळण्यात आला आहे. परंतु, त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना दुसरी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार असल्याची माहिती नार्वेकरांनी दिली. तर, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता प्रसाद ओक करणार असल्याची माहिती आहे. मात्र,आता या सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच विधानभवनात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याबाबत जाहीर केलं होतं. त्यानुसार विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र विधानभवनात बसवण्याबाबत राहुल नार्वेकर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर नार्वेकर यांनी निर्णय घेतल्याचं विधिमंडळाच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात जाहीर केलं होतं. त्या निर्णयानुसार 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.


हेही वाचा : शिंदेच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’नंतर, आता मनसेचं ‘बाळासाहेबांचा राज


 

First Published on: January 17, 2023 10:16 PM
Exit mobile version