बिनविरोध निवडणुकीचं आवाहन तर केलं, पण राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा नक्की अर्थ काय?

बिनविरोध निवडणुकीचं आवाहन तर केलं, पण राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा नक्की अर्थ काय?

Raj Thackeray Letter to MVA leaders | मुंबई – कसबा पेठ आणि चिंचवड येथे होऊ घातलेली पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंनी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. दिवंगत आमदाराच्या घरातील उमेदवार उभे राहणार असतील तर त्याजागी बिनविरोध निवडणूक करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे, असा राज ठाकरेंचा पत्राचा आशय आहे. परंतु, या जागेवर जर दिवंगत आमदाराच्या घरातून उमेदवार उभा न केल्यास मतदारही सहानुभूती दाखवेलच असं नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी बिनविरोधासाठी केलेली मागणी केवळ चिंचवडसाठी असून कसब्यासाठी नाही, आणि याठिकाणाहून मनसेही उमेदवार उभे करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

हेही वाचा कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुका बिनविरोध करा, राज ठाकरेंचे मविआला पत्र

कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली असून चिंचवड येथून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडीकडूनही संयुक्तरित्या निवडणूक लढवण्यात येणार आहे. त्यांनी अद्यापही याबाबत उमेदवारांची अधिकृत नावे जाहीर केली नसून ती लवकरच जाहीर करण्यात येतील. मात्र, त्याआधीच राज ठाकरेंनी लेटर बॉम्ब फोडला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून या निवडणुका बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच त्यांनी यासाठी अंधेरी पोटनिवडणुकीचा दाखला दिला आहे. मात्र, हे पत्र लिहिताना त्यांनी शाब्दिक चलाखी करत मनसेच्या राजकीय भूमिकेबाबतही संभ्रामवस्था निर्माण केली आहे. त्यामुळे चिंचवड येथून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे मनसे तेथून उमेदवार उभे करणार नाहीत. आणि त्याच मतदारसंघाच्या बिनविरोध निवडणुकीसाठी त्यांनी महाविकास आघाडीला पत्र लिहिले असावे. कारण, कसबा पेठेतून हेमंत रासने यांना उमेदवारी दिली असून ते दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयातील नाहीत. त्यामुळे या जागेवर मनसे उमेदवार जाहीर करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

संभ्रम निर्माण करणारं वाक्य कोणतं?

“मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही”, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

या उताऱ्यातील शेवटच्या वाक्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की उमेदवार निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील नसेल तर जनता देखील सहानुभूती दाखवणार नाही. म्हणजेच, कसब्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही उमेदवारी जाहीर करू शकते, असा तर्क काढण्यास वाव आहे.

राज ठाकरेंचं संपूर्ण पत्र जसेच्या तसे

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.

कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.

First Published on: February 5, 2023 11:14 AM
Exit mobile version