‘राज्याला काही मिळणार नाही म्हणून सेसला विरोध करणे योग्य नाही’

‘राज्याला काही मिळणार नाही म्हणून सेसला विरोध करणे योग्य नाही’

‘सेस हा केंद्र सरकारचा कर असला तरी केंद्र सरकार काय एपीएमसी नाही. त्यामुळे अखेर हा सगळा पैसा राज्याकडे जाणार आहे. त्यामुळे राज्याला काही मिळाले नाही म्हणून सेसला विरोध करायचा हे योग्य नाही’, असा टोला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांना लगावला. केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प नुकताच (Union Budget 2021) सादर केला. देशाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सामान्यांना त्यातून काहीच मिळाले नाही, असे म्हणत अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर विरोधकांनी अर्थसंकल्पाकडून निराशा झाल्याची टीका केली. ‘अर्थसंकल्पाचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून असताना बजेटमध्ये राज्याला काहीही मिळाले नसल्याचे’ विरोधकांकडून बोलण्यात आले. यावर आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रतित्तर दिले आहे.

महाराष्ट्रातून जे आरोप झालेत ते चुकीचे

‘अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्पाचा संपूर्ण डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून असताना त्याकरता कोणतीही विशेष तरतूद केलेली नाही. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा’, तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर निर्मला सीतारमण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘इन्फ्रास्टक्चर बाबात प्रत्येक राज्यात पैसे दिले आहेत. नाशिक आणि नागपूरबाबत मी घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून जे आरोप झालेत ते चुकीचे आहेत. देश विकायला काढला हे म्हणणे हे चुकीचे आहे’, अशी प्रतिक्रिया सीतारमण यांनी दिली आहे.

पेट्रोलचे दर कंपन्या ठरवतात

पेट्रोल-डिझेलचे दर केंद्र सरकारकडून ठरवले जात नाहीत तर ऑईल कंपन्यांकडून ठरवले जातात. तसेच या किंमती फिक्स नसतात. तसेच जागतिक किंमती वाढत असल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत.


हेही वाचा – Uttarakhand Joshimath Dam: हिमकडा कोसळ्याने नदीला पूर; अनेक जण वाहून गेल्याची भिती


 

First Published on: February 7, 2021 4:47 PM
Exit mobile version