राज्यपालांच्या विरोधात अनोखे आंदोलन, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांची घोषणाबाजी

राज्यपालांच्या विरोधात अनोखे आंदोलन, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांची घोषणाबाजी

राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे आहेत. भरत गोगावलेंची प्रतोदपदी केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निरिक्षम नोंदवले आहे

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या विरोधी पक्षाने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्यपालांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. राज्यपाल काळी टोपी घालतात. त्यामुळे विरोधकांनी काळ्या टोप्या उंचावत राज्यपालांचा निषेध केला.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या थोर प्रभृतींविषयी चुकीची वक्तव्यं केली आहेत. आणखी एका कार्यक्रमात त्यांनी मराठी माणसाचा अवमान होईल, असे वक्तव्य केले आहे. राज्यपाल सध्या सारवासारव करीत असून चूक झाली असेल तर क्षमा मागतो, असे म्हणतात. चूक झाली असेल तर त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय होतो. ज्या मराठी माणसांच्या महाराष्ट्रात, मुंबईत रहायचे त्यांच्याच स्वाभिमानाला धक्का द्यायचा, असे हे कृत्य असल्याची टीका आंदोलनात सहभागी आमदारांनी केली.

शेतकरी शेतात जसे बुजगावणे उभे करतात, तसे आंदोलनाच्यावेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी राज्यपाल आणि सरकारचा निषेध केला. पिकाच्या संरक्षणासाठी शेतात बुजगावणे उभारले जाते. पाखरांनी दाणे खाऊ नये, असा त्यामागचा उद्देश असतो. राज्यातदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या रुपात दोन बुजगावणे आहेत. यांच्यासमोर गायरान जमीन खाल्ली जात आहे, भूखंड चोरले जात आहेत, महापुरुषांचा अपमान केला जात असून हे बुजगावणेरुपी सरकार गप्प बसले, अशी जळजळीत टीका विरोधकांनी यावेळी केली.

या आंदोलनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीच्या बहुसंख्य आमदारांचा सहभाग होता.


हेही वाचा : राज्यपाल हटवण्याच्या मागणीवर सरकारकडून उत्तरंच नाही, अजित पवारांचा हल्लाबोल


 

First Published on: December 30, 2022 6:39 PM
Exit mobile version