असंघटीत कामगारांमध्ये आता शेतमजूरांचा समावेश; कामगार मंत्री सुरेश खाडे यांची माहिती

असंघटीत कामगारांमध्ये आता शेतमजूरांचा समावेश; कामगार मंत्री सुरेश खाडे यांची माहिती

मुंबई : राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये आता शेतमजुरांचाही समावेश केला असून केवळ २५ रुपयांमध्ये त्यांची नोंदणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे नोंदणीची ही रक्कम राज्य सरकार भरणार भरणार असल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. (Unorganized workers now include agricultural labourers Information from Labor Minister Suresh Khade)

राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ तसेच बांधकाम मजूर मंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण तसेच अन्य बाबतीत मदत केली जाते.

असंघटित कामगारांमध्ये आतापर्यंत शेतमजुरांचा समावेश केला नव्हता. मात्र यापुढे शेतमजुरांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतमजुरांना याचा फायदा होणार असून शेतमजुरांची नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा त्यांना थेट लाभ घेता येणार आहे, असा दावाही खाडे यांनी केला.

कामगारांच्या नोंदणीसाठी २५ रुपये शुल्क सरकार भरणार आहे. कामगारांना केवळ एक रुपया शुल्क भरावे लागणार आहे. राज्यातील कामगार आणि त्यांच्या पाल्यांना विविध खेळांमध्ये संधी मिळावी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा पातळीवर कामगार क्रीडा भवन उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मिरज येथे कामगार साहित्य संमेलन

दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी कामगार साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा साहित्य संमेलनाचे सतरावे वर्ष असून हे साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील मिरज येथे येत्या २४ आणि २५ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडेल, अशी माहितीही खाडे यांनी दिली.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंचे काम लोकांना बघवत नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला

First Published on: February 8, 2023 9:50 PM
Exit mobile version