पुढील ५ दिवस अवकाळीसह गारपिटीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’

पुढील ५ दिवस अवकाळीसह गारपिटीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांना ‘अलर्ट’

सध्या बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याची भर अद्याप झाली नाही तोवर आता पुढील पाच दिवसात अवकाळीसह आता गारपिटीचंही संकट घोंगावू लागलं आहे. हवामान विभागाकडून यासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रब्बी हंगामाची पिके काढणीला आली असताना आता शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळी आणि गारपीट असं दुहेरी संकट ओढावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात आजपासून म्हणजेच १५ ते १८ मार्च दरम्यान गारपीटीसह अवकाळी पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. यादरम्यान विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात गेल्या पंधरवड्यात दुसऱ्यांदा खराब हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील तयार पीक व काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आज नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. मुंबईत आज एक-दोन पावसाच्या सरी पडून आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

१६ मार्चसाठी जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह वादळाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, या दिवशी अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

First Published on: March 15, 2023 2:24 PM
Exit mobile version