Corona Vaccination: आठवडाभरात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू होणार

Corona Vaccination: आठवडाभरात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सुरू होणार

संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसचा नियंत्रित संसर्ग पसरला. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नव वर्षाच्या सुरुवातीपासून केंद्र सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. आपात्कालीन वापरासाठी दोन कोरोना लसींना मान्यता देण्यात आली. त्यानंतर १६ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन कोरोना लसी देण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे लसीकरण होत आहे. आता कोरोनाच्या काळात अहोरात्र काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण आठवडाभरात सुरू होणार आहे.

फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण लवकरच सुरू होणार असल्यामुळे महापालिका लसीकरणासाठी केंद्र वाढवणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. तसेच पोलिस, सफाई कर्मचारी, स्वयंसवी संस्थांचे प्रतिनिधी, गृहरक्षक दल, कार्यकर्ते इत्यादींचा लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभाग असणार आहे. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना देखील या टप्प्यात लस दिली जाणार आहे.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांनी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची माहिती देताना सांगितले की, ‘आठवडाभरात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होईल. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लस देऊन या टप्प्याला सुरुवात केली जाईल. यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, महापालिका प्रशासकांचा समावेश असेल. महापालिकेचे सिडको एन ८ येथील पालिकेचे आरोग्य केंद्र, धूत हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार रुग्णालय, कमलनयन बजाज रुग्णालय, एमजीएम हॉस्पिटल, घाटी रुग्णालय, आयएमए, सीएसएमएसएस, सिग्मा हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना लसीकरणाची व्यवस्था केली असून दुसऱ्या टप्प्यासाठी लसीकरणाच्या केंद्रामध्ये आणखी वाढ करण्याची शक्यता पाडळकर यांनी वर्तवली आहे. दरम्यान माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यातील मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोरोना लस घेणार आहेत.


हेही वाचा – Union Budget 2021: आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा; कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद


 

First Published on: February 2, 2021 7:37 PM
Exit mobile version